Join us  

सिटी सेंटर मॉलची आग ४० तासांनी नियंत्रित

By ऑनलाइन लोकमत | Published: October 24, 2020 4:13 PM

City Center Mall fire : मोठया प्रमाणावर वित्तहानी

मुंबई : मुंबई सेंट्रल येथील सिटी सेंटर मॉलला लागलेली आग तब्बल ४० तासांनी नियंत्रित आली असून, या आगीत मोठया प्रमाणावर वित्तहानी झाली आहे. विशेषत: दस-याच्या मुहुर्तावर येथे मोठी आर्थिक उलाढाल होण्याचे संकेत असतानाच तीनएक दिवस अगोदर घडलेल्या या दुर्घटनेमुळे येथील व्यापा-यांना मोठे नुकसान सहन करावे लागले आहे. शनिवारी दुपारी येथील आगीवर नियंत्रण मिळविण्यात अग्निशमन दलास यश आले असले तरी ही आग पुर्णत: शमलेली नव्हती. संपुर्ण मॉलमध्ये पसरलेला धूर, काळोख, राखेच्या ढिगा-यात बदलेली दुकाने आणि मजल्यांवरून वाहणारे पाणी; अशी अवस्था शनिवारी येथे दिवसभर होती, अशी माहिती येथील व्यापाराशी संबंधित काही दुकानदारांनी दिली.

गुरुवारी रात्री सुमारे ८ वाजून ५३ मिनिटांनी मुंबई सेंट्रल येथील सिटी सेंटर मॉलला लागलेल्या आगीत शामराव बंजारा, रवींद्र प्रभाकर चौगुले, भाऊसाहेब बदाने, संदीप शिर्के आणि गिरकर हे अग्निशमन दलाचे पाच जवान जखमी झाले. तर सिटी सेंटर मॉलला अगदी लागून असलेल्या ऑर्किड एन्क्लेव या ५५ मजली इमारतीमधील अंदाजे ३ हजार ५०० रहिवाशांचे सुरक्षिततेची आवश्यकता लक्षात घेऊन जवळच्या मैदानामध्ये स्थलांतर करण्यात आले. येथील आग विझवण्यासाठी सुमारे २५० अधिकारी व कर्मचारी प्रयत्न करत होते. शुक्रवारी दुपारपर्यंत साडे तीन वाजण्याच्या सुमारास आग कव्हर करण्यात आली होती. प्रारंभी दुसऱ्या मजल्यावर आग लागली. त्यानंतर ही आग तिसऱ्या मजल्यावर पसरली. आग विझवण्यासाठी २४ फायर इंजिन, १६ जंबो टँकर यांच्यासह एकूण ५० अग्नि विमोचक वाहने तैनात, कार्यरत होती. 

गुरुवारी मध्यरात्री २ वाजून ४१ मिनिटांनी ही आग ब्रिगेड कॉल स्तराची अग्निशमन दलाने घोषित केली होती. आग विझवण्यासाठी मुंबई महापालिकेच्या ए, सी आणि डी वार्ड मध्ये पाण्याचे टँकर भरण्यात आले. आणि येथून ते घटना स्थळी धाडण्यात आले. या टँकरची संख्या ८० वर होती, अशी माहिती महापालिकेकडून देण्यात आली. दरम्यान, मुंबई सेंट्रल येथील आग लागलेल्या सिटी मॉलची मुंबई शहरचे पालकमंत्री अस्लम शेख यांनी शुक्रवारी भेट देऊन पाहणी केली. यावेळी दुर्घटनेच्या चौकशीचे आदेशही त्यांनी दिले.

-------------------

सिटी सेंटर मॉल तळमजला अधिक तीन मजले स्वरूपाची इमारत आहे. या ठिकाणी प्रारंभी दुसऱ्या मजल्यावर आग लागली. या मजल्यावर मोबाईल, प्रिंटर, स्टेशनरी, फर्निचर आणि इतर साहित्यांचे गाळे होते. या गाळ्यांना  ही आग लागल्याचे निदर्शनास आले.  

टॅग्स :आगमुंबईमुंबई महानगरपालिका