Join us

Mumbai Local: लसीचे दोन डोस घेतलेल्या नागरिकांना लोकल प्रवासाची मुभा द्यावी; भाजपा खासदाराची मागणी

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 4, 2021 18:31 IST

एकीकडे सरकारच्या नव्या अध्यादेशाप्रमाणे मुंबई,ठाणे आणि अन्य भागात कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाल्याने दुकाने रात्री 10 पर्यंत खुली ठेवण्यास राज्य सरकारने परवानगी दिली आहे.

मनोहर कुंभेजकरलोकमत न्यूज नेटवर्क

मुंबई - एकीकडे सरकारच्या नव्या अध्यादेशाप्रमाणे मुंबई,ठाणे आणि अन्य भागात कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाल्याने दुकाने रात्री 10 पर्यंत खुली ठेवण्यास राज्य सरकारने परवानगी दिली आहे. मात्र अजूनही मुंबई लोकल सेवा सुरू करण्यास राज्य सरकारने अजून हिरवा कंदील दाखवला नाही. महाराष्ट्र सरकारने लसीचे दोन डोस घेतलेल्या नागरीकांना लोकल ट्रेन मध्ये लवकर  प्रवासाची परवानगी द्यावी अशी अशी मागणी आता जोर धरू लागली आहे.

छोटे व्यापारी, नोकरदार, श्रमिक लोकांना गेले दीड वर्ष बरेच काही सहन करावे लागले आहे. कोरोना महामारीत अनेक कुटुंबाने आपल्या परिवारातील जवळचे नातेवाईकांना गमविले आहे. कामकाज बंद असल्याने सर्व ठेवी, शिल्लक पैसे खर्च केले.  मध्यमवर्ग आणि गरीब वर्गाने तर इथून तिथून मदत घेऊन किंवा कर्ज घेऊन उदर निर्वाह केला. लसीकरण कार्यक्रमा अंतर्गत लसीचे दोन्ही डोस घेतलेल्या  नागरीकांना आपआपल्या व्यवसाय स्थळी पोहाचाण्यासाठी लवकर मुंबईच्या लोकल ट्रेन मध्ये प्रवास करण्याची मुभा द्यावी अशी मागणी उत्तर मुंबईचे भाजपा खासदार गोपाळ शेट्टी यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे केली आहे.

मुंबईकरांसाठी रेल्वे लोकल सुरू करा यासाठी आपण सातत्याने पाठपुरावा करत असल्याचे सांगून खासदार गोपाळ शेट्टी म्हणाले की, तत्कालीन रेल्वे मंत्री पीयूष गोयल  यांना दि, २ जुलै रोजी पत्राद्वारे कोरोना प्रतिबंधक लसीचे दोन डोस घेतलेल्या नागरिकाना  लोकल ट्रेनने प्रवासाची परवानगी द्यावी अशी मागणी केल्याचे त्यांनी  सांगितले. 

मुंबई उच्च न्यायालयानेही एका जनहित याचिकेच्या सुनावणीत दोन डोस घेतलेल्या नागरीकांना लोकल ट्रेन प्रवासाची मुभा देण्याबाबत महाराष्ट्र सरकारने विचार करावा, असे निरीक्षण नोंदविल्याच्या मुद्द्यावरही खासदार शेट्टी यांनी लक्ष वेधले.

दि २९ जून रोजी केंद्रीय अर्थमंत्री  निर्मला सीतारमन यांना ही पत्र लिहून देशाची अर्थव्यवस्था चालण्यासाठी दोन डोस घेतलेल्या नागरिकांना खास बाब म्हणून विशेष सवलती घ्याव्यात अशी मागणी केली होती. त्याला दि १९ जुलै रोजी केंद्रीय अर्थमंत्री  निर्मला सीतारमन यांनी उत्तर दिल्याचे त्यांनी सांगितले.

टॅग्स :गोपाळ शेट्टीमुंबई लोकल