पाण्यासाठी नागरिकांची भिस्त स्टॅण्डपोस्टवर
By Admin | Updated: January 15, 2015 23:15 IST2015-01-15T23:15:02+5:302015-01-15T23:15:02+5:30
विरार शहराच्या पश्चिमेस असलेल्या या प्रभागाची लोकसंख्या गेल्या १० वर्षांत मोठ्या प्रमाणात वाढली. त्यामुळे पिण्याच्या पाण्याचा प्रश्न अधिक गंभीर होत गेला.

पाण्यासाठी नागरिकांची भिस्त स्टॅण्डपोस्टवर
दीपक मोहिते, वसई
विरार शहराच्या पश्चिमेस असलेल्या या प्रभागाची लोकसंख्या गेल्या १० वर्षांत मोठ्या प्रमाणात वाढली. त्यामुळे पिण्याच्या पाण्याचा प्रश्न अधिक गंभीर होत गेला. १० वर्षांत हजारो नागरी संकुले या प्रभागात उभारण्यात आली. परंतु, त्यामध्ये राहावयास आलेल्या रहिवाशांना मात्र रस्त्यावरील स्टॅण्डपोस्टवर आपली तहान भागवावी लागत आहे. दैनंदिन वापरासाठी विकासकांनी विहिरीचे पाणी उपलब्ध केले, परंतु पिण्याचे पाणी मात्र या रहिवाशांना स्टॅण्डपोस्टवरून आणावे लागते. नागरीकरण मोठ्या प्रमाणात झाले, परंतु हा प्रभाग सोयीसुविधांपासून मात्र वंचित राहिला.
रस्ते, भूमिगत गटारे व अन्य विकासकामे झाली, पण पिण्याच्या पाण्याचा प्रश्न मात्र आजही जैसे थे स्थितीत आहे. पाण्याची उपलब्धता व वाढत्या लोकसंख्येची गरज यांचा ताळमेळ बसू शकत नसल्यामुळे येथील रहिवाशांना अतिरिक्त धरण उपलब्ध होईपर्यंत प्रतीक्षा करावी लागणार आहे. रस्ता रुंदीकरणामुळे नागरिकांना दिलासा मिळाला, परंतु या प्रभागात होणाऱ्या वाहतूककोंडीवर मात्र कोणतीही उपाययोजना होऊ शकली नाही. त्यामुळे रस्ता रुंदीकरण होऊनही नागरिकांचे हाल कमी झालेले नाहीत. पार्किंग व फेरीवाला झोन न झाल्यामुळे रस्त्यांवर अस्ताव्यस्त स्थितीत उभ्या असलेल्या दुचाकी व अनधिकृत फेरीवाल्यांचे अतिक्रमण सर्वत्र पाहावयास मिळते. यावर उपाययोजना करण्यासंदर्भात प्रभाग समितीने कधीही पावले उचलली नाहीत. प्रभागातील मुख्य रस्त्यांची पुनर्बांधणी व डागडुजीची कामे झाली, परंतु गावागावांतील रस्ते अद्याप सुधारलेले नाहीत. महानगरपालिकेच्या फंडातून विकासकामे झाली. परंतु लोकसंख्येच्या तुलनेत अपुरी आहेत.