तुलसी विवाहाच्या तयारीसाठी नागरिकांची लगबग सुरू
By Admin | Updated: November 2, 2014 23:30 IST2014-11-02T23:30:59+5:302014-11-02T23:30:59+5:30
आधुनिक युगात हिंदू संस्कृतीत तुळसी विवाह सोहळ्याला अत्यंत महत्त्वाचे स्थान आहे. आजही अनेक ठिकाणी हा विवाह झाल्याशिवाय घरातील शुभविवाह न करण्याची प्रथा पाळली जाते

तुलसी विवाहाच्या तयारीसाठी नागरिकांची लगबग सुरू
रेवदंडा : आधुनिक युगात हिंदू संस्कृतीत तुळसी विवाह सोहळ्याला अत्यंत महत्त्वाचे स्थान आहे. आजही अनेक ठिकाणी हा विवाह झाल्याशिवाय घरातील शुभविवाह न करण्याची प्रथा पाळली जाते. कार्तिक शुद्ध एकादशी ते पौर्णिमा या कालावधीत हा विवाह होतो. या विवाहानंतर चातुर्मासाची समाप्ती होते. पर्यायाने वधू-वरांच्या विवाहाच्या सगळ्या तिथी मोकळ्या होतात.
ग्रामीण भागात दरवर्षी तुलसी विवाहाला अंगण तयार करून लाल मातीने सारवले जाते. तुळशी वृंदावनाची आकर्षक अशी रंगरंगोटी केली जाते. ही कामे ग्रामीण भागात नागरिक आवडीने करताना दिसतात. यानिमित्ताने बाजारपेठेतही पूजनासाठी लागणारी उसाची कांडी, चिंच-आवळासारखी फळे विक्रीला आली आहेत.
काही ठिकाणी कुरमुरे, उसाच्या कांड्या, त्यात साखर नाहीतर बत्तासे घालून ते तुळशीसमोर उडवायची आणि त्यानंतर गावातील नागरिकांना वाटायची परंपरा आजही अबाधित आहे. (वार्ताहर)