Join us  

आयआयटी बॉम्बेचे तज्ज्ञ करणार सीईटीच्या आक्षेपांचे निरसन

By ऑनलाइन लोकमत | Published: July 21, 2019 3:35 AM

सीईटी सेलची माहिती; अतिरिक्त सदस्यांसह तज्ज्ञ समिती घेणार निर्णय

मुंबई : राज्य सीईटी सेलने एमएचटीसीईटीचा जाहीर केलेल्या निकालात नॉर्मलायझेशन प्रक्रियेचा वापर करून पर्सेन्टाइल पद्धतीने निकाल जाहीर केला. मात्र त्यानंतर, यावर अनेक विद्यार्थी आणि पालकांनी आक्षेप नोंदविले. दरम्यान, ज्या विद्यार्थ्यांना या नॉर्मलायझेशन प्रक्रियेबाबत आक्षेप असतील, त्यांनी प्रतिज्ञापत्र भरून ते नोंदवावेत, असे आवाहन सीईटी सेलने केले आहे. विद्यार्थ्यांचे आक्षेप हे इंडियन इन्स्ट्यिूट ऑफ टेक्नॉलॉजी (आयआयटी) बॉम्बे यांच्या दोन अतिरिक्त सदस्य आणि मूळ तज्ज्ञ समिती यांच्यासमोर सादर करण्यात येतील आणि त्यांचा निर्णय संबंधित विद्यार्थी/पालक आणि उच्च न्यायालयाला कळविण्यात येणार असल्याची माहिती सीईटी सेल आयुक्त आनंद रायते यांनी परिपत्रकाद्वारे दिली आहे.

यंदा ऑनलाइन घेतलेल्या सीईटीत विद्यार्थ्यांना मिळालेले एकूण गुण आणि रँकचा उल्लेख नाही. त्यामुळे जेईई, नीट परीक्षांच्या धर्तीवर केवळ पसेंटाईलद्वारे निकाल जाहीर केला. २०१९ सीईटी ऑनलाइन परीक्षेसंबंधी सांख्यिकी तज्ज्ञ समिती नॉर्मलायझेशन फॉर्म्युला निश्चित करणे, प्रक्रिया ठरविणे आणि निकाल ठरविणे, यासाठी तज्ज्ञ समिती सीईटी सेलमार्फत गठीत करण्यात आली होती. त्यामुळे आपल्यास नेमके किती गुण मिळाले, याचा अंदाज बांधता येणे कठीण झाले. त्यामुळे निकाल जाहीर झाल्यानंतर अनेक विद्यार्थी आणि पालकांनी ईमेल आणि अर्ज लिहून सीईटी सेलला आपले आक्षेप नोंदविले. गुण कसे देण्यात आले, कितीगुण मिळाले, संबंधित प्रक्रिया कशाप्रकारे राबवण्यात आली, असे अनेक प्रश्न निर्माण झाल्याने विद्यार्थ्यांमध्ये संभ्रम होता. या संबंधित अनेक विद्यार्थ्यांनी आक्षेप घेत याला विरोध केला. तसेच उच्च न्यायालयातही याचिका दाखल केली. यावर उच्च न्यायालयाने सीईटी सेलच्या बाजूने निर्णय दिला असला, तरी विद्यार्थ्यांच्या शंकाचे निरसन करण्याचेही आदेश दिले आहेत.गुण, रँकबाबत विद्यार्थी, पालक अनभिज्ञएमएचटी-सीईटी परीक्षेचा निकाल पर्सेंटाईल पद्धतीने जाहीर झाल्यामुळे, विद्यार्थी व पालकांना एकूण गुण किंवा रँक याबाबत कोणतीही कल्पना नाही. त्यामुळे ९० ते ९५ पर्सेंटाईल मिळालेल्यांनाही चांगल्या अभियांत्रिकी महाविद्यालयात प्रवेश मिळेल, असे पालकांना वाटत आहे, पण ते वास्तव नाही. प्रत्यक्षात ९९. ६५ पर्सेंटाईलच्या आत गुण मिळालेल्या विद्याथ्याची संख्या १ हजार आहे. त्यामुळे १०० ते ९९. ६५ पर्सेंटाईल मिळालेल्याच पुणे-मुंबई येथील नामांकित्ो महाविद्यालयात प्रवेश मिळेल, उर्वरित विद्यार्थ्यांना इतर अभियांत्रिकी महाविद्यालयांमध्ये प्रवेश घ्यावा लागेल, असे शिक्षणतज्ज्ञांचे मत आहे.

टॅग्स :आयआयटी मुंबई