सिडकोचे मनोधैर्य वाढविणारे वर्ष
By Admin | Updated: December 27, 2014 22:21 IST2014-12-27T22:21:38+5:302014-12-27T22:21:38+5:30
मावळते वर्ष सिडकोचे मनोधैर्य वाढविणारे ठरले आहे. महत्वकांक्षी अशा अंतरराष्ट्रीय विमानतळाच्या भूसंपादनाचा प्रश्न मार्गी लागला.

सिडकोचे मनोधैर्य वाढविणारे वर्ष
कमलाकर कांबळे ल्ल नवी मुंबई
मावळते वर्ष सिडकोचे मनोधैर्य वाढविणारे ठरले आहे. महत्वकांक्षी अशा अंतरराष्ट्रीय विमानतळाच्या भूसंपादनाचा प्रश्न मार्गी लागला. तसेच भ्रष्टाचारामुळे मलिन झालेली प्रतिमा पुसून टाकण्यात प्रशासनाला काही प्रमाणात यश आले. पारदर्शक आणि भ्रष्टाचार मुक्त कारभारासाठी राबविलेल्या विविध उपाययोजना फलदायी ठरल्याचे दिसून आले आहे. सिडकोने वर्षभरात काही चांगले निर्णय घेतले. महत्वाच्या प्रकल्पांचा श्रीगणेशा केला. त्यामुळे हे सरते वर्ष सर्वार्थाने सिडकोचे मनोधैर्य वाढविणारे ठरले.
भूसंपादन आणि पुनर्वसनाच्या मुद्यावरून रखडलेल्या आंतरराष्ट्रीय विमानातळाचा प्रश्न सरत्या वर्षात मार्गी लागला. भूसंपादनाला विरोध करणाऱ्या ग्रामस्थांची समजूत काढण्यात सिडकोला यश आले. विशेषत: या कामात सिडकोच्या सह व्यवस्थापकीय संचालिका यांचे सकारात्मक प्रयत्न मोलाचे ठरले. याचा परिणाम म्हणून भूसंपादनाला विरोध करणाऱ्या बारा महसुली गावातील ११९४ खातेदारांनी सिडकोला संमतीपत्रे सादर केली आहेत. संमतीपत्रे देणाऱ्या या भूधारकांना २२.५ टक्के योजनेअंतर्गत विकसीत भूखंड वाटपाची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. या योजनेअंतर्गत आतापर्यंत ६६७ भूखंडांचे वाटप करण्यात आले आहे.
विमानतळाचा महत्त्वकांक्षी प्रकल्प मार्गी लावतानाच सिडकोचा कारभार लोकाभिमूख आणि पारदर्शक करण्यावर व्यवस्थापकीय संचालक संजय भाटीया यांनी भर दिला.
वाशी रेल्वे स्थानकाजवळील आंतरराष्ट्रीय दर्जाच्या प्रदर्शन केंद्राचे लोकार्पण ही सुध्दा मावळत्या वर्षातील सिडकोची मोठी उपलब्ध ठरली. त्याचबरोबर सिडको नोडमध्ये गृहनिर्माण सोसायट्या आणि खासगी संस्थांना सीसीटीव्ही कोडचे बंधन, सिडकोने सवलतीच्या दरात दिलेल्या भूखंडांवर उभारलेल्या शैक्षणिक संस्थात प्रकल्पग्रस्तांच्या मुलांना आरक्षण, रूग्णालयात २0 टक्के स्थानिकांना प्राधान्य, विकास नियमावलीत सुधारणा, नागरीकांच्या समस्यांसाठी एक खिडकी योजना, धार्मिक व अध्यामिक तसेच शैक्षणिक संस्थाना भूखंड वाटपासाठीच्या धोरणात सुधारणा आदी महत्वपूर्ण निर्णय या मावळत्या वर्षात सिडको प्रशाासनाने घेतले.
विशेषत: सिडकोतील भ्रष्टाचाराचे मूळ असलेल्या साडे बारा टक्के भूखंड योजना पारदर्शक करण्यावर भर देण्यात आला. विविध उत्पन्न गटांतील ग्राहकांसाठी सुमारे साडे चार हजार घरांचा समावेश असलेले व्हॅलिशिल्प आणि स्वप्नपूर्ती हे दोन गृहप्रकल्प याच वर्षी मार्गी लागले. क्षेत्रफळाने नवी मुंबईपेक्षा दुप्पट असलेल्या सिडकोच्या नयना परिसरातील विकासाला प्रत्यक्षपणे चालना दिली. यात २३ गावांचा पायलट प्रोजेक्टचा (नयना) विकास करण्याचा निर्णय सिडकोने घेतला.
अनधिकृत बांधकाम विभाग अपयशी
अनधिकृत बांधकामांना आळा घालण्यास सिडकोला या वर्षात सपशेल अपयश आल्याचे दिसून आले. याचा परिणाम म्हणून या सरत्या वर्षात शहरात मोठ्या प्रमाणात अतिक्रमणे उभी राहिली. पूर्वी कारवाई करून जमीनदोस्त करण्यात आलेली अनेक बांधकामे बिनदिक्कतपणे उभी करण्यात आली. वर्षाच्या शेवटच्या टप्प्यात अतिक्रमणांवर नियंत्रण ठेवण्यासाठी सुनील केंद्रेकर या आय.ए.एस. अधिकाऱ्याची नियुक्ती करण्यात आली.
भ्रष्टाचाराला आळा
सरत्या वर्षात विविध स्तरावर सिडकोने आपल्या सकारात्मक कार्याचा ठसा उमटवला. भ्रष्टाचाराला आळा घालण्यासाठी पोलीस महासंचालक दर्जाच्या डॉ. प्रज्ञा सरवदे यांची सिडकोत पूर्णवेळ दक्षता अधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली. त्यामुळे सिडकोतील भ्रष्टाचारी प्रवृत्तीला काही प्रमाणात आळा बसल्याचे दिसून आले. तर या काळात दोन लाचखोर कर्मचाऱ्यांना अटक करण्यात आली.