सिडकोत लवकरच ‘सॅप’

By Admin | Updated: August 12, 2015 01:12 IST2015-08-12T01:12:08+5:302015-08-12T01:12:08+5:30

सिडकोचा कारभार लोकाभिमुख आणि पारदर्शक करण्याच्या दृष्टीने सिडकोने प्रशासकीय सुधारणांवर भर दिला आहे. याअंतर्गत गेल्या दोन वर्षांत विविध स्तरावर प्रयत्न करण्यात आले.

Cidcoet soon to 'sap' | सिडकोत लवकरच ‘सॅप’

सिडकोत लवकरच ‘सॅप’

नवी मुंबई : सिडकोचा कारभार लोकाभिमुख आणि पारदर्शक करण्याच्या दृष्टीने सिडकोने प्रशासकीय सुधारणांवर भर दिला आहे. याअंतर्गत गेल्या दोन वर्षांत विविध स्तरावर प्रयत्न करण्यात आले. त्याचाच एक भाग म्हणून चांगल्या प्रशासनासाठी सिडकोत लवकरच ‘सॅप’ या संगणकीय कार्यप्रणालीचा अवलंब करण्यात येणार आहे, अशी माहिती सिडकोचे उपाध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक संजय भाटिया यांनी दिली.
‘सॅप’ या कार्यालयीन संगणक प्रणालीच्या पूर्वतयारी कार्यशाळेच्या समारोपप्रसंगी ते बोलत होते. याप्रसंगी सहव्यवस्थापकीय संचालिका व्ही. राधा, मुख्य दक्षता अधिकारी डॉ. प्रज्ञा सरवदे यांच्यासह सर्व विभागप्रमुख व अधिकारी उपस्थित होते. आता विभागांच्या अंतर्गत कार्यप्रक्रियांमध्ये सुधारणा व सुसूत्रता आणण्यासाठी विशेष प्रयत्न केले जाणार आहेत, सॅप हा त्याचाच एक भाग आहे. या प्रणालीमुळे कालबाह्य झालेल्या कार्यपद्धती बाद ठरून निर्णय प्रक्रिया अधिक गतिमान व नि:पक्षपाती होईल, असा विश्वास भाटिया यांनी व्यक्त केला आहे. लेखा विभागातर्फे सुचविण्यात आलेल्या आॅनलाइन रक्कम अदा करण्याच्या सुविधेची अंमलबजावणी पुढील महिन्यात करण्यात येईल. बांधकाम परवाना विभागातर्फे ‘कोपास’ ही कार्यप्रणाली परीक्षणाच्या टप्प्यात असून लवकरच ती अमलात आणली जाईल. त्याचप्रमाणे नवी मुंबईसाठी जीआयएस मॅपिंग व इतर सूचना प्राधान्याने हाती घेण्यात येतील, असेही त्यांनी या वेळी स्पष्ट केले.
नागरिकांना केवळ सेवा पुरविण्याऐवजी आपण त्यांना उत्तम प्रशासन देण्याचे उद्दिष्ट डोळ्यासमोर ठेवले पाहिजे, असे मत व्ही.राधा यांनी व्यक्त केले. सॅप प्रणालीची अंमलबजावणी हा सुशासन प्रकल्प आहे. सॅप प्रणाली हे एक असे साधन आहे ज्याचा वापर आपण योग्य दिशेने केला तर भविष्यात त्याचे नक्कीच फायदे मिळतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
चर्चासत्राच्या अखेरीस सिडकोच्या कार्यपद्धतीत पारदर्शकता आणून प्रशासकीय सेवेचा कायापालट करण्यासाठी मेहनत घेतलेल्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना संजय भाटिया यांच्या हस्ते प्रशस्तिपत्र आणि स्मृतिचिन्ह प्रदान करण्यात आले. (प्रतिनिधी)

Web Title: Cidcoet soon to 'sap'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.