अनधिकृत बांधकामांविषयी सिडकोची आज बैठक
By Admin | Updated: May 29, 2015 23:11 IST2015-05-29T23:11:01+5:302015-05-29T23:11:01+5:30
अनधिकृत बांधकामांविषयी सिडकोने आजी-माजी महापौर, आमदार व खासदारांची बैठक शुक्रवारी आयोजित केली होती.

अनधिकृत बांधकामांविषयी सिडकोची आज बैठक
नवी मुंबई : अनधिकृत बांधकामांविषयी सिडकोने आजी-माजी महापौर, आमदार व खासदारांची बैठक शुक्रवारी आयोजित केली होती. परंतु सर्वच लोकप्रतिनिधींनी प्रकल्पग्रस्तांच्या सर्व नेत्यांना बोलावण्याचा आग्रह धरला. त्यामुळे शनिवारी सकाळी पुन्हा बैठकीचे आयोजन केले आहे.
सिडकोने अनधिकृत बांधकामांविरोधात मोहीम सुरू केली आहे. या मोहिमेस सर्वपक्षीय राजकीय नेत्यांनी विरोध सुरू केला आहे. लोकप्रतिनिधींना विश्वासात घेण्यासाठी बैठक आयोजित केली होती. या बैठकीस आमदार मंदाताई म्हात्रे, संदीप नाईक, प्रशांत ठाकूर, महापौर सुधाकर सोनावणे, माजी खासदार रामशेठ ठाकूर, माजी महापौर सागर नाईक उपस्थित होते. सर्वच लोकप्रतिनिधींनी प्रकल्पग्रस्तांची बाजू मांडली. गरजेपोटी बांधलेल्या घरांसाठी प्रकल्पग्रस्त कृती समिती, शेतकरी संघटना व इतर सामाजिक, राजकीय संघटना लढा देत आहेत. याविषयी फक्त लोकप्रतिनिधींशी बोलून उपयोग नाही. सर्व संघटनांच्या प्रतिनिधींना विश्वासात घ्यावे असे मत सर्वच लोकप्रतिनिधींनी मांडले.
लोकप्रतिनिधींच्या भूमिकेमुळे शुक्रवारच्या बैठकीमध्ये काहीच निर्णय होऊ शकला नाही. शनिवारी सकाळी साडेदहा वाजता २० ते २२ प्रकल्पग्रस्त प्रतिनिधींना बैठकीसाठी बोलावण्यात आले आहे. या बैठकीमध्ये सिडको त्यांची भूमिका स्पष्ट करणार आहे. (प्रतिनिधी)
सिडकोने लोकप्रतिनिधींची बैठक आयोजित केली होती. परंतु प्रकल्पग्रस्तांच्या प्रश्नावर अनेक संघटना काम करत आहेत. त्या सर्वांना चर्चेमध्ये सहभागी करून घ्यावे असे मत आम्ही मांडले आहे. शनिवारी पुन्हा बैठक होणार असून प्रकल्पग्रस्तांच्या हितासाठीची भूमिका आम्ही सर्व जण मांडणार असून पुढील भूमिका बैठकीनंतर स्पष्ट केली जाईल.
- मंदा म्हात्रे, आमदार, बेलापूर मतदारसंघ