सिडकोचा गुंतवणूक मंत्र
By Admin | Updated: August 28, 2015 23:39 IST2015-08-28T23:39:46+5:302015-08-28T23:39:46+5:30
नवी मुुंबई विमानतळासाठी स्थानिक शेतकऱ्यांच्या जमीन संपादित करण्यात आल्या आहे. प्रकल्पबाधितांसाठी २२.५ टक्के विकसित भूखंडाचे धोरण आणि विस्थापित होणाऱ्या बांधकामधारकांसाठी
सिडकोचा गुंतवणूक मंत्र
- प्राची सोनवणे, नवी मुंबई
नवी मुुंबई विमानतळासाठी स्थानिक शेतकऱ्यांच्या जमीन संपादित करण्यात आल्या आहे. प्रकल्पबाधितांसाठी २२.५ टक्के विकसित भूखंडाचे धोरण आणि विस्थापित होणाऱ्या बांधकामधारकांसाठी पुनर्वसन व पुन:स्थापनाचे पॅकेज जाहीर केले आहे. या पार्श्वभूमीवर प्रकल्पबाधितांमधील नाते दृढ करण्यासाठी व त्यांच्या उज्ज्वल भवितव्यासाठी सिडकोने पुढाकार घेतला आहे. जमिनीच्या मोबदल्यात मिळणाऱ्या रकमेची गुंतवणूक व विकसित भूखंडाच्या विकासाविषयी तज्ज्ञांकडून मार्गदर्शन करण्यात येत आहे.
विमानतळ प्रकल्पबाधितांना गुंतवणुकीविषयी मार्गदर्शन करण्यासाठी विशेष कार्यशाळेचे वाशीतील एक्झिबिशन सेंटरमध्ये आयोजन केले होते. या कार्यशाळेमध्ये २० पेक्षा अधिक बँकांचे प्रतिनिधी व इतर तज्ज्ञांना मार्गदर्शनासाठी बोलावण्यात आले होते. विमानतळाच्या उभारणीसाठी एकूण २ हजार २६८ हेक्टर जमिनीची आवश्यकता आहे, त्यापैकी ६७१ हेक्टर खाजगी जमीन संपादित करण्याचे काम सुरू आहे. या क्षेत्रात येणाऱ्या १० गावांचे पुनर्वसनही करायचे होते. या सगळ््याचा सारासार विचार करून राज्य सरकारने प्रकल्पबाधितांसाठी २२.५ टक्के विकसित भूखंडाचे धोरण आणि विस्थापित होणाऱ्या बांधकामधारकांसाठी पुनर्वसन व पुन:स्थापनाचे पॅकेज जाहीर केले आहे.
प्रकल्पबाधितांना विश्वासात घेऊन पारदर्शी कामाची भूमिका बजाविण्याकरिता सिडकोने या १० गावांमधील सर्वच ग्रामस्थांशी चर्चा करून त्यांना या विकासात्मक प्रकल्पाची संपूर्ण माहिती देण्यात आली. यामध्ये उलवे, तरघर, कोंबडभुजे, गणेशपूर, वाघीवली - वाड, वरचे ओवळे, वाघीवली, कोल्ही, कोपर, चिंचपाडा या सर्व गावांमधील ग्रामस्थांसोबत चर्चा करून त्यांना या प्रकल्पाची संपुर्ण माहिती दिली तसेच या सर्व कुटुंबांच्या पुनर्वसनाची सर्वच जबाबदारी पेलत त्यांना भविष्यात समस्या उद्भवणार नाही अशी शाश्वतीही देण्यात आली.
सिडको स्वत: इमारत बांधू इच्छिणाऱ्या बाधितांसाठी १०० चौरस मीटर क्षेत्रफळापर्यंतच्या भूखंडासाठी इमारतींचे तयार नमुने व आराखडे विनामूल्य देण्यात येणार आहेत. बांधकामासाठी लागणाऱ्या परवानग्या देण्यासाठी ‘एक खिडकी’ योजना राबविण्यात येणार असल्याचेही प्रशासनाच्यावतीने स्पष्ट करण्यात आले आहे.
सेंट्रल पार्क, गोल्फ कोर्स, सिडको प्रदर्शन केंद्र, आगरी कोळी सांस्कृतिक भवन अशा यशस्वी महत्त्वाकांक्षी प्रयोगानंतर नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ हा प्रकल्पही तेवढाच विकासात्मक प्रकल्प ठरणार असल्याने यामध्ये प्रकल्पबाधितांचा समावेश असणे अतिशय महत्त्वाचे आहे, असे सह व्यवस्थापकीय संचालिका व्ही. राधा यांनी सांगितले.
शासनाकड़ून मिळालेले भूखंड न विकता त्या भूखंडांचा स्वत:च विकास करावा आणि त्यासाठी लागणारे कर्ज मिळवून देण्यासाठी २० हून अधिक बँकांना या ठिकाणी सहभागी करण्यात आले होते.
प्रकल्पग्रस्तांना मिळणारे लाभ
पुष्पकनगर दापोली येथे अडीच एफएसआयसह २२.५ टक्के भूखंड
उपलब्ध एफएसआयमधील १५ टक्के एफएसआयचा वाणिज्य वापरासाठी वापर करण्याची परवानगी
विमानतळ कंपनीची स्थापना झाल्यानंतर १० रुपये किमतीचे १०० समभाग मोफत
प्रत्यक्ष भूखंडाचा ताबा देण्यापूर्वी वाटपपत्राच्या आधारे हस्तांतरणास तसेच त्रिपक्षीय करारनामा करण्यास मुभा
महिलांना मार्गदर्शन
प्रशिक्षण शिबिरासाठी प्रकल्पग्रस्त महिलांनाही बोलावण्यात आले होते. महत्त्वाच्या निर्णयांमध्ये महिलांचाही सहभाग असायला हवा, असे मत व्ही. राधा यांनी व्यक्त केले. सिडकोच्या विकास प्रकल्पाबाबत महिलांनाही पुरेशी माहिती असायला हवी यासाठी प्रकल्पबाधित महिलांनाही या ठिकाणी संघटित करण्यात आले होते.महिलांना या सर्व योजनेची माहिती देऊन त्याचे शंकानिरसन करण्यात आले.
स्थलांतरीतांसाठी योजना
बांधकाम छपराखालील बांधीव क्षेत्राच्या तिप्पट क्षेत्राचा दीड चटईक्षेत्रासह विकसित भूखंड
प्रति चौरस फुटास एक हजार रुपये दराने गृहबांधणी अर्थसहाय्य
एकरकमी निर्वाह भत्ता व एकरकमी अर्थसहाय्य
विमानतळ कंपनीची स्थापना झाल्यानंतर १०० समभाग
पूर्ण सहकार्य करणार
सिडको भूखंड हस्तांतरण, इमारत परवानगी, बांधकाम परवानगी, भूखंड हस्तांतरणासाठी पूर्णपणे सहकार्य करणार आहे. भूखंडांच्या विकासासाठी येणाऱ्या अडचणींविषयी मार्गदर्शन करण्यात येणार असून त्याविषयी पुस्तिका वितरीत करण्यात आली आहे. प्रकल्पग्रस्तांनी जमिनीच्या मोबदल्यात येणाऱ्या पैशांचे कुठे व कशी गुंतवणूक करता येईल याचीही माहिती देण्यात आली.
कुठे होणार भूखंड वाटप?
विमानतळ, बहुउद्देशीय मार्गिका, मेट्रो, मुंबई ट्रान्स हार्बर सी लिंकजवळ भूखंडाचे वितरण
भूखंडाचे वितरण पारदर्शक होण्यासाठी खास संगणकीय सोडत पद्धतीचा अवलंब
२२.५ टक्के योजनेप्रमाणे पुष्पकनगर दापोली येथे पुन:स्थापनेसाठी वडघर, वहाळ व कुंडेवहाळ येथे भूखंड वाटप
भूखंड विकासाची त्रिसूत्री...
विकासक बना
प्रकल्पबाधितांनी स्वत:च विकासक बनून गरजेनुसार वित्तीय संस्थांच्या आर्थिक मदतीने भूखंड विकसित केल्यास नक्कीच आर्थिक फायदा होईल. आवश्यकतेनुसार बांधकामासाठी वित्तीय संस्थांकडून कर्ज घ्यावे.
एकत्रीकरणातून विकास
एकत्रीकरणातून भूखंड विकासाचे फायदे लक्षात येण्यासाठी पुण्यातील मगरपट्टा सिटीला प्रकल्पग्रस्तांच्या भेटीचे आयोजन करण्यात आले होते. विमानतळबाधितांसाठी सिडको पायाभूत सुविधा विकसित करणार असल्याने ही एक सुवर्णसंधी आहे. एकत्रीकरणातून भूधारकांना स्वत:चा भूखंडाचा विकास करण्याची संधी मिळणार आहे. यामुळे बांधकाम खर्चातही बचत होणार आहे.
भूखंडाची विक्री
बाजारभाव, कायदेशीर माहिती घेऊन भूखंड विक्रीचा विचार करावा. यातून हाती येणाऱ्या रकमेचे व्यवस्थित नियोजन आवश्यक आहे. फसवणूक होणार नाही याची दक्षता घ्यावी.