गोठीवलीत चालला सिडकोचा बुलडोझर
By Admin | Updated: June 3, 2015 04:08 IST2015-06-03T04:08:44+5:302015-06-03T04:08:44+5:30
सिडकोने अतिक्रमणांच्या विरोधात कारवाईचा धडाका सुरूच ठेवला आहे. त्याअंतर्गत आज गोठीवली येथील चार बहुमजली इमारतींवर कारवाई

गोठीवलीत चालला सिडकोचा बुलडोझर
नवी मुंबई : सिडकोने अतिक्रमणांच्या विरोधात कारवाईचा धडाका सुरूच ठेवला आहे. त्याअंतर्गत आज गोठीवली येथील चार बहुमजली इमारतींवर कारवाई करून त्या जमीनदोस्त करण्यात आला. कारवाईला विरोध करणाऱ्या सुमारे २५0 ग्रामस्थांना अटक करण्यात आली आहे. यात महिलांचाही मोठा समावेश आहे. अटक करण्यात आलेल्या या सर्वांची संध्याकाळी जामिनावर मुक्तता करण्यात आली.
प्रकल्पग्रस्तांचा प्रखर विरोध झुगारून सिडकोने अतिक्रमणांच्या विरोधात कारवाई मोहीम सुरूच ठेवली आहे. ३0 जूनपर्यंत न्यायालयात प्रतिज्ञापत्र सादर करायचे असल्याने सिडकोने कारवाई अधिक गतिमान केली आहे. सोमवारी नेरूळमधील इमारत, झोपड्यांवरील धडक कारवाईनंतर आज गोठीवलीतील अतिक्रमणांवर हातोडा मारण्यात आला. कडेकोट पोलीस बंदोबस्तासह सिडकोचे पथक सकाळी दहा वाजता गावात दाखल झाले. मात्र आज वटपौर्णिमा असल्याने महिलांनी रस्त्यावरच वडाच्या पूजेचा घाट घालून पथकाचा मार्ग अडविण्याचा प्रयत्न केला. मात्र पोलिसांनी पूजेचा हा डाव उधळून लावत अतिक्रमणांवरील कारवाई सुरू केली. या कारवाईत पाच मजल्यांच्या तीन व एक मजल्याची एक अशा चार बेकायदा इमारतींवर बुलडोझर फिरविण्यात आला.
दरम्यान, सिडकोच्या या कारवाईविरोधात ग्रामस्थांनी आज पुन्हा आक्रमक पवित्रा घेतला. संतप्त महिलांनी सिडकोच्या विरोधात घोषणाबाजी सुरू केली. त्यामुळे परिसरात काही काळ तणावाची परिस्थिती निर्माण झाल्याने पोलिसांना लाठीचार्ज करावा लागला. याचा परिणाम म्हणून संतप्त ग्रामस्थांनी जेल भरो आंदोलनाचा नारा देत कारवाईत अडथळा निर्माण करण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे पोलिसांनी महिलांसह जवळपास अडीचशे ग्रामस्थांना अटक करून संध्याकाळी जामिनावर सुटका केली. अटक केलेल्यात कामगार नेते श्याम म्हात्रे, काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष दशरथ भगत, माजी उपमहापौर रमाकांत म्हात्रे, भाजपाचे युवा नेते वैभव नाईक, कृती समितीचे अध्यक्ष मनोहर पाटील आदींचा समावेश होता. या सर्वांची जामिनावर सुटका करण्यात आली. (प्रतिनिधी)