Join us

चर्चगेट ते विरार रेल्वे धावणार सुसाट, परेने १४ ठिकाणी वेगाचे निर्बंध हटविले

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 6, 2025 12:12 IST

पश्चिम रेल्वेवरील वक्तशीरपणा सुधारण्यासाठी प्रशासनाने गेल्यावर्षी अनेक ठिकाणी वेगमर्यादा काढणे, रेल्वे मार्गाची देखभाल-दुरुस्ती करणे यासारख्या उपाययोजना केल्या आहेत.

मुंबई : पश्चिम रेल्वेने २४ एप्रिल ते २५ जुलै या कालावधीत चर्चगेट ते विरार दरम्यान १४ ठिकाणी कायमस्वरूपी सुरक्षेच्या कारणासाठी लावलेले वेग निर्बंध काढले आहेत. अनेक ठिकाणी रुळांची, नव्या मार्गिकांची, देखभाल दुरुस्तीची, पुलांची कामे सुरू असल्याने हे वेग निर्बंध लावण्यात आले होते. 

पश्चिम रेल्वेवरील वक्तशीरपणा सुधारण्यासाठी प्रशासनाने गेल्यावर्षी अनेक ठिकाणी वेगमर्यादा काढणे, रेल्वे मार्गाची देखभाल-दुरुस्ती करणे यासारख्या उपाययोजना केल्या आहेत. तसेच विद्युतीकरण १०० टक्के पूर्ण झाल्याने वेगवान इलेक्ट्रिक इंजिनद्वारे वक्तशीरपणा वाढविण्यासाठी मदत झाली. मेल-एक्स्प्रेसचा वक्तशीरपणा ९५ टक्क्यांवर पोहचला होता. आता आणखी १४ ठिकाणी वेग निर्बंध काढल्याने त्यामध्ये आणखी वाढ होण्याची शक्यता आहे. पश्चिम रेल्वेवर अत्यावश्यक ठिकाणी मेल, एक्स्प्रेस, लोकलसाठी वेग मर्यादा असते. रुळांची, स्लिपरची दुरुस्ती केल्याने वेग निर्बंध काढण्यात मदत झाली असल्याचे अधिकारी म्हणाले. 

येथील काढले निर्बंध माटुंगा-माहीम दरम्यान २, माहीम-वांद्रे दरम्यान २, सांताक्रूझ, अंधेरी यार्ड, सांताक्रूझ-वांद्रे, वांद्रे-माहिम, माहीम-माटुंगा, जोगेश्वरी-गोरेगाव आणि नालासोपारा -नायगाव या विभागात प्रत्येकी एक ठिकाणी तर नालासोपारा-नायगाव विभागातील तीन ठिकाणांचे हे निर्बंध काढण्यात आले. 

रेल्वेगाड्या वेळेवर धावेल याची खात्री करण्यासाठी रुळांची मानके सुधारून वळणदार भाग कमी करण्यात आले आहेत. काही वेगावरील निर्बंध अजूनही असून त्याठिकाणची कामे पूर्ण झाल्यावर ती सुद्धा काढण्यात येतील.विनीत अभिषेक, मुख्य जनसंपर्क अधिकारी, पश्चिम रेल्वे

यामुळे निर्बंध काढणे शक्य पश्चिम रेल्वेने ५८.८७ किमी स्लीपर बदलण्याचे काम पूर्ण केले. टीआरटी मशीनच्या मदतीने जूने, जीर्ण स्लीपर बदलले. गोरेगाव-कांदिवली दरम्यान सहावी मार्गिका पूर्ण केली वांद्रे माहीम दरम्यानच्या स्क्रू पुलाच्या शेवटच्या खांबाची पुनर्रचना. अनेक ठिकाणी जुने स्टील गर्डर काढून सिमेंट स्लॅब बसविले. 

टॅग्स :लोकलप्रवासी