कांदळवनाचा ऱ्हास थांबवणारे हेलिकॉप्टर सर्वेक्षण रखडलेच

By Admin | Updated: December 2, 2014 00:50 IST2014-12-02T00:50:15+5:302014-12-02T00:50:15+5:30

रेतीचे उत्खनन करण्यासाठी व खाडीत अनधिकृत भराव टाकण्यासाठी खाडीकिनाऱ्याच्या कांदळवनाचा मोठ्या प्रमाणात ऱ्हास होत आहे.

Chopper helicopter survey stops the destruction of the crop | कांदळवनाचा ऱ्हास थांबवणारे हेलिकॉप्टर सर्वेक्षण रखडलेच

कांदळवनाचा ऱ्हास थांबवणारे हेलिकॉप्टर सर्वेक्षण रखडलेच

सुरेश लोखंडे, ठाणे
रेतीचे उत्खनन करण्यासाठी व खाडीत अनधिकृत भराव टाकण्यासाठी खाडीकिनाऱ्याच्या कांदळवनाचा मोठ्या प्रमाणात ऱ्हास होत आहे. यास आळा घालण्यासाठी लवकरच हेलिकॉप्टरद्वारे सर्वेक्षण करून कांदळवनाचे संरक्षण करण्याचे आश्वासन तत्कालीन पालकमंत्री गणेश नाईक यांनी डीपीडीसीमध्ये दिले असले तरी ते अद्यापही रखडले आहे.
त्सुनामीपासून बचाव करणाऱ्या खारफुटीच्या कांदळवनाचे संरक्षण करण्याचे न्यायालयाचे आदेश असतानाही जिल्ह्यातील ठाणे खाडीसह मुंब्रा, दिवा, डोंबिवली, भार्इंदर खाड्यांतील कांदळवने जाळून नष्ट केली जात आहेत. याशिवाय, दिवागाव परिसरातील खाडीकिनाऱ्याच्या कांदळवनावर मोठ्या प्रमाणात भराव घालून त्या झुडुपांना दाबले जात आहे. काही ठिकाणी खारफुटीच्या मोठमोठ्या झाडांच्या बुंध्याखाली केमिकल्स टाकून झाडे मारून टाकली जात आहेत. दिवा-मुंब्रा खाडीकिनारी व या दरम्यानच्या रेल्वे लाइनला असलेले कांदळवन जेसीबी, पोकलेन मशीनद्वारे उपटून टाकले जात आहे. अनधिकृत रेती उत्खननासाठी कांदळवनाचा मोठ्या प्रमाणात ऱ्हास केला जात आहे. याकडे जिल्हा व तालुका प्रशासनाकडून गांभीर्याने पाहिले जात नसल्यामुळे कांदळवन नष्ट होण्याच्या उंबरठ्यावर आहे. त्सुनामीच्या कालावधीत समुद्रातील मोठमोठ्या लाठांचा जोर कमी करण्याची महत्त्वपूर्ण भूमिका कांदळवनाने पार पाडल्याचे सिद्ध झाले आहे. यामुळे कांदळवनाचे सर्वेक्षण करण्याचे आदेश न्यायालयाने दिले असतानाही जिल्हा प्रशासनाकडून त्याकडे गांभीर्याने पाहिले जात नसल्याचे वास्तव आहे.

Web Title: Chopper helicopter survey stops the destruction of the crop

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.