रोडरोमीओला भररस्त्यात चोप
By Admin | Updated: May 18, 2015 05:14 IST2015-05-18T05:14:09+5:302015-05-18T05:14:09+5:30
मोबाइल दुकानात उभी असलेल्या महिलेसोबत अश्लील चाळे करणाऱ्या रोडरोमीओला महिलेने भररस्त्यात चोप दिला. शनिवारी सायंकाळी ही

रोडरोमीओला भररस्त्यात चोप
मुंबई : मोबाइल दुकानात उभी असलेल्या महिलेसोबत अश्लील चाळे करणाऱ्या रोडरोमीओला महिलेने भररस्त्यात चोप दिला. शनिवारी सायंकाळी ही घटना कुर्ला रेल्वे स्थानकाबाहेर घडली असून, पोलिसांच्या भीतीने या रोडरोमीओने तत्काळ घटनास्थळावरून पळ काढला.
कुर्ल्याच्या कुरेशीनगर परिसरात राहणारी शाहबाज (नाव बदललेले आहे़) ही महिला शनिवारी सायंकाळी कुर्ला रेल्वे स्थानक परिसरात आली होती. मोबाइलची बॅटरी खराब असल्याने ती रेल्वे स्थानकाजवळ असलेल्या एका मोबाइल दुकानात गेली. या दुकानाबाहेर हा रोडरोमीओ काही महिलांना पाहून अश्लील चाळे करीत होता. पीडित महिला या दुकानात शिरताच तोदेखील मोबाइल खरेदीचा बहाणा करून दुकानात शिरला. मात्र काहीही खरेदी न करता तो या महिलेकडे अश्लील नजरेने पाहात तिला इशारे करू लागला. पहिल्यांदा या महिलेने या इमसाकडे दुर्लक्ष केले. मात्र तो महिलेकडे पाहून अधिकच इशारे करू लागल्याने महिलेने त्याला जाब विचारला. यावर या इसमाने या महिलेलाच उलट उत्तरे दिली. त्यामुळे संतापलेल्या या महिलेने या इसमाला दुकानातून बाहेर काढत भर रस्त्यात त्याची धुलाई सुरू केली.
कुर्ला रेल्वे स्थानकात तशी नेहमीच प्रवाशांची मोठी गर्दी पाहायला मिळते. या घटनेच्या वेळेस देखील या ठिकाणी मोठी गर्दी होती. मात्र महिलेसोबत छेडछाड होत असताना कोणीही पुढे आला नाही. त्यामुळे या महिलेनेच या रोडरोमीओला जबर चोप दिला. त्यामुळे काही वेळातच या ठिकाणी बघ्यांची मोठी गर्दी जमा झाली होती.
बराच वेळ त्याला चोप दिल्यानंतर ही महिला या रोडरोमीओला पोलिसांच्या ताब्यात देणार होती, मात्र तो घटनास्थळावरून पळून गेला. (प्रतिनिधी)