Join us  

Chiplun Flood : 'नारायणे राणेंच्या मुलांसारखी मुलं महाराष्ट्रात कोणाच्या पोटी जन्माला येऊ नयेत'

By ऑनलाइन लोकमत | Published: July 29, 2021 2:54 PM

Chiplun Flood : कोकणातील शिवसेना नेते आणि आमदार भास्कर जाधव यांनी राणे कुटुंबीयांवर खोचक टीका केली आहे. तसेच, शिवसेना सोडल्यापासून शिवसेनेला शिव्या देऊन नारायण राणेंनी आपलं अस्तित्व टिकवल्याचंही जाधव यांनी म्हटलं. 

मुंबई - केंद्रीयमंत्री नारायण राणे आणि शिवसेना हा वाद आता नवा राहिला आहे. त्यामुळेच, शिवसेनेतील कार्यकर्त्यांपासून ते आमदार आणि पक्षप्रमुखांपर्यंत अनेकांना राणे कुटुंबीयांवर प्रहार केला आहे. यापूर्वीशिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनीही नारायण राणे आणि त्यांच्या दोन्ही मुलांवर बोचऱ्या शब्दात टीका केली होती. आता, कोकणातील शिवसेना नेते आणि आमदार भास्कर जाधव यांनी राणे कुटुंबीयांवर खोचक टीका केली आहे. तसेच, शिवसेना सोडल्यापासून शिवसेनेला शिव्या देऊन नारायण राणेंनी आपलं अस्तित्व टिकवल्याचंही जाधव यांनी म्हटलं. 

राज्यातील पूरपरिस्थितीवरुन सध्या सत्ताधारी आणि विरोधक एकमेकांवर टीका करत आहेत. त्यातच, कोकणातील पूरस्थितीमुळे नारायण राणे आक्रमक झाल्याचं पाहायला मिळत आहे. तर, दुसरीकडे त्यांची मुलेही राज्य सरकारसह शिवसेना नेत्यांना लक्ष्य करत आहेत. त्यातूनच, भास्कर जाधव यांनी राणे कुटुंबीयांवरच जोरदार प्रहार केला आहे.    

'नारायणराव राणेंना मी सल्ला देऊन काही फायदा नाही. कारण त्यांची जी मुलं आहेत ना खरं सांगायला गेलं तर महाराष्ट्रामध्ये अशी मुलं कोणाच्या पोटी जन्माला येऊ नयेत, असंच प्रत्येक आई-बाप म्हणेन. महाराष्ट्रासारख्या सुसंस्कृत राज्यामध्ये, थोरा-मोठ्यांचा आदर करणाऱ्या राज्यामध्ये पक्ष वेगवेगळे असू शकतात. मतमतांतर वेगळी असू शकतात पण आपण कोणती भाषा कोणाबद्दल वापरतो याचं अजिबात भानं नाहीए. आपण कोणाबद्दल काही भाषा वापरायची पण दुसऱ्याने त्याचा प्रतिवाद करायचा नाही. अशी जी मुलं आहेत किंवा नारायण राणेंबद्दल बोलायला मला इच्छा सुद्धा होत नाही,' असं भास्कर जाधव म्हटलं आहे. लोकशाही या वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत जाधव यांनी राणे कुटुंबीयांवर प्रहार केला. दरम्यान, यापूर्वीही भास्कर जाधव यांनी राणेंच्या मुलाबद्दल विचारलेल्या प्रश्नावर मी फडतूस लोकांबद्दल बोलत नाही, असे उत्तर दिले होते.  

राणेंनी त्यांच्या पक्षाचं वर्धापन दिनाऐवजी वर्षश्राद्ध घातलं

नारायण राणेंनी जेंव्हा शिवसेना सोडली तेव्हा ९ आमदार त्यांच्याबरोबर गेले. दुसऱ्या निवडणुकीमध्ये एक तरी आमदार निवडून आला का? त्याच्या पुढच्या निवडणुकीत ते स्वतः निवडून आले का? त्यांचा मुलगा पुन्हा निवडून आला का? ते वांद्रे येथून उभे राहिले तेव्हा निवडून आले का? त्यांनी आपला पक्ष काढला आणि त्याचा वर्धापन दिन साजरा करण्याऐवजी वर्ष पूर्ण होण्याआधी त्याचं वर्षश्राद्ध घातलं. स्वतःच्या मुलाला निवडून आणू शकत नाहीत. म्हणून भाजपाच्या दरवाजात जाऊन उभे राहिले. ते काय शिवसेनेला शिव्या देणार आणि कसली पाळमुळं रोवणार,” असा सवालही भास्कर जाधव यांनी या मुलाखतीत उपस्थित केला. 

टॅग्स :नारायण राणे भास्कर जाधवपूरशिवसेना