Join us

चिंतामण वनगा यांच्या निधनाने आदिवासींचा समर्पित सेवक हरपला - रावसाहेब दानवे 

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 30, 2018 14:37 IST

भारतीय जनता पक्षाचे खासदार चिंतामण वनगा यांच्या निधनाने पक्षाने आदिवासी समाजाचा समर्पित सेवक आणि पक्षाचा निष्ठावंत कार्यकर्ता गमावला आहे अशी शब्दांत भाजपा प्रदेशाध्यक्ष रावसाहेब पाटील दानवे यांनी श्रद्धांजली वाहिली आहे

मुंबई - भारतीय जनता पक्षाचे खासदार चिंतामण वनगा यांच्या निधनाने पक्षाने आदिवासी समाजाचा समर्पित सेवक आणि पक्षाचा निष्ठावंत कार्यकर्ता गमावला आहे अशी शब्दांत भाजपा प्रदेशाध्यक्ष रावसाहेब पाटील दानवे यांनी श्रद्धांजली वाहिली आहे. पालघरचे खासदार ॲड. चिंतामण वनगा यांचे मंगळवारी (29 जानेवारी) दिल्ली येथे हृदयविकाराच्या तीव्र धक्क्याने निधन झाले. ते ६७ वर्षांचे होते. त्यांना राममनोहर लोहिया (दिल्ली) रुग्णालयात दाखल करून उपचार केले जात असताना त्यांची प्राणज्योत मालवली. राजकरणातील संत माणूस असलेले वनगा यांच्या जाण्याने पालघर जिल्ह्यावर शोककळा पसरली आहे.

'चिंतामण वनगा यांनी प्रतिकूल परिस्थितीशी संघर्ष करत ठाणे जिल्ह्याच्या ग्रामीण भागात पक्षाची बांधणी केली. सध्याच्या पालघर जिल्ह्यात आदिवासी वस्त्यांमध्ये कम्युनिस्ट पक्षाच्या दहशतीला न जुमानता त्यांनी भाजपाचे कार्यकर्ते जोडले. नम्र स्वभाव व साधेपणा या त्यांच्या वैशिष्ट्यांमुळे पक्षाचा जनाधार वाढविण्यास मदत झाली', अशी आठवण रावसाहेब दानवेंनी सांगितली. 

'1990 ते 1996 या कालावधीत ठाणे ग्रामीण जिल्हाध्यक्ष या नात्याने त्यांनी प्रभावी कार्य केले. भाजपाच्या अनुसूचित जमाती मोर्चाचे अध्यक्ष म्हणूनही त्यांची कारकिर्द चांगली होती. ते तीन वेळा लोकसभा सदस्य म्हणून तर एक वेळा विधानसभा सदस्य म्हणून निवडून आले होते. लोकप्रतिनिधी म्हणून मिळालेल्या अधिकारांचा वापर त्यांनी आदिवासी समाजाच्या कल्याणासाठी केला. ते उच्चशिक्षित होते आणि त्यांनी आपल्या ज्ञानाचा आणि पदाचा वापर कायम आदिवासी समाजाचे प्रश्न सोडविण्यासाठी केला. त्यांच्या निधनाने पक्षाचे कधीही भरून येणार नाही असे नुकसान झाले आहे', अशी खंत त्यांनी यावेळी व्यक्त केली.

टॅग्स :रावसाहेब दानवेचिंतामण वनगा