चायनीज मांजाला पोलिसांचीच ढील 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 3, 2021 01:51 AM2021-01-03T01:51:59+5:302021-01-03T01:52:06+5:30

विक्रीमुळे वाढला धोका : मांजामुळे पक्ष्याच्या जीवावर बेतले

Chinese rope relaxed by the police | चायनीज मांजाला पोलिसांचीच ढील 

चायनीज मांजाला पोलिसांचीच ढील 

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : मकर संक्रांतीच्या काळात मुंबईत सर्वत्र पतंग उडविण्याचे प्रमाण वाढते. मात्र पतंग उडवताना वापरण्यात येणारा नायलॉनचा चायनीज मांजा अनेकदा माणसांच्या तसेच मुक्या प्राणी-पक्ष्यांच्या जीवावर बेततो. अनेकदा हा मांजा घरांवरून, इमारतींवरून व झाडांवरून जमिनीपर्यंत लटकल्याने तेथून जाणारा दुचाकीस्वार जखमी होतो. तसेच हवेत उडणाऱ्या पक्ष्यांच्या पंखांमध्ये हा मांजा गुंतल्याने ते जखमी होतात. 

 


यामुळे अनेक प्राण्यांना व पक्ष्यांना कायमचे अपंगत्वही येते. या घातक चायनीज मांजामुळे मागील काळात अनेक अपघात झाल्यामुळे प्रशासनाने त्यावर बंदी आणली आहे.  मुंबईतील अनेक ठिकाणी हा मांजा सहजपणे उपलब्ध होत आहे. कमी पैशांमध्ये न तुटणारा मांजा सहज उपलब्ध होत असल्याने मुलेदेखील हा मांजा घेणे पसंत करतात. मात्र हा मांजा विकणाऱ्यांवर पोलीस कारवाई करत नसल्याने माणसांचा, पक्ष्यांचा जीव धोक्यात असल्याचे चित्र निर्माण झाले आहे. चायनीज मांजा हा नायलॉनने बनवलेला असतो. त्याचप्रमाणे त्याच्यावर काचेचे कोटिंग लावलेले असते. हा मांजा सहजासहजी तुटत नाही तसेच त्याचा लवकर नाशदेखील होत नाही. यामुळे हा मांजा एखाद्याच्या जीवाला धोकादायक आहेच, परंतु पर्यावरणासदेखील अत्यंत हानिकारक आहे. अनेक प्राणीमित्रांकडून मकर संक्रांतीच्या वेळी हा मांजा न वापरण्याचे आवाहन दरवर्षी करण्यात येते. मात्र तरीदेखील अनेक ठिकाणी हा मांजा वापरला जात आहे. यामुळे यावर नक्की नियंत्रण कुणाचे आहे, असा प्रश्न निर्माण होत आहे. 

चायनीज मांजा विक्रीला बंदी आहे. दरवर्षी मांजा विक्रेत्यांवर पोलीस कठोर कारवाई करतात. यंदा अद्याप मांजा विक्रेत्यांवर कोणतीही कारवाई केली नसली तरीदेखील यापुढे करणार असल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे.
मांजामुळे पक्षी व महिला जखमी
मागच्या आठवड्यात नाशिक येथे एका महिलेचा चायनीज मांजामुळे गळा चिरला गेल्याने मृत्यू झाला होता. असे अपघात मुंबईतदेखील दरवर्षी शेकडोंच्या प्रमाणात होतात. त्याचप्रमाणे कावळा, कबूतर, चिमण्यांचाही या मांजामुळे मृत्यू होतो. तर काही पक्ष्यांना कायमचे अपंगत्व येते. हा मांजा पर्यावरणासुद्धा अत्यंत हानिकारक आहे.
यंदा अद्यापही मांजा विक्रेत्यांवर कारवाई नाही
मुंबईत अनेक परिसरामध्ये चायनीज मांजा सहजरीत्या उपलब्ध आहे. मात्र कोणत्याही मांजा विक्रेत्यावर अद्यापही कारवाई झालेली नाही. मागील वर्षी अनेक मांजा विक्रेत्यांकडून मांजा जप्त करून त्यांच्यावर दंडात्मक कारवाई करण्यात आली होती. त्यामुळे यंदा मकरसंक्रांतीच्या काळात मांजा विक्रेत्यांवर कारवाई होणार का याकडे सर्वांचे लक्ष आहे.

चायनीज मांजा न वापरण्याबाबत दरवर्षी जनजागृती करण्यात येते. मात्र अनेक ठिकाणी हा मांजा सहज व स्वस्त उपलब्ध होत असल्याने तो वापरण्यात येतो. या मांजामुळे जखमी झालेले प्राणी व पक्षी दरवर्षी वाचविले जातात. त्यामुळे चायनीज मांजा विक्री थांबायलाच हवी.
- परेश प्रभू, पक्षीमित्र

Web Title: Chinese rope relaxed by the police

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.