गणेशोत्सवात चायनीज माळांचा झगमगाट
By Admin | Updated: August 26, 2014 23:36 IST2014-08-26T23:36:45+5:302014-08-26T23:36:45+5:30
गणेशोत्सवात आकर्षक विद्युत रोषणाईसाठी विविध प्रकारच्या चायनीज माळा बाजारपेठेत दाखल झाल्या आहेत. अत्यंत कमी किमतीत उपलब्ध असलेल्या या माळा घेण्यासाठी गणेशभक्तांची गर्दी होत आहे.

गणेशोत्सवात चायनीज माळांचा झगमगाट
कामोठे : गणेशोत्सवात आकर्षक विद्युत रोषणाईसाठी विविध प्रकारच्या चायनीज माळा बाजारपेठेत दाखल झाल्या आहेत. अत्यंत कमी किमतीत उपलब्ध असलेल्या या माळा घेण्यासाठी गणेशभक्तांची गर्दी होत आहे.
शहरातील बाजारपेठेत अनेक दुकानांच्या बाहेरील बाजूस चायनीज कंपनीच्या दिव्यांच्या माळा लटकावलेल्या दिसतात. मागील काही वर्षांपासून चायनीज माळांचीच चलती आहे. सर्वसामन्यांच्या खिशाला परवडतील अशा दरात या माळा मिळत असल्याने बहुतांशी गणेशभक्तांत चायनीज माळांनाच प्रथम पसंती देत आहेत. काही वर्षापूर्वीपर्यंत भारतीय बनावटीच्या विद्युत माळांना मागणी होती. परंतु त्यांच्या किमती सर्वसामान्यांच्या आवाक्याबाहेर जातात. मुंबईहून चायनीज माळांची पनवेल, कामोठे, खांदा कॉलनी, नवीन पनवेलात मोठ्या प्रमाणात आयात होते. प्रामुख्याने घरी प्रतिष्ठापना होणाऱ्या गणेशमूर्तीभोवती विद्युत रोषणाईसाठीच या माळांची विक्री होते. साधारणत: २५ रुपयांपासून ते २०० रुपयांपर्यंत १२ ते १५ फूट लांब स्वरूपात या विद्युत माळा उपलब्ध आहेत.
विद्युत माळांप्रमाणेच गणेशमूर्तीसमोर ठेवण्याकरिता एलईडी दिव्यांची समई उपलब्ध आहे. तिला यंदा जास्त मागणी आहे. गणेशमूर्तीवर मंद प्रकाश पाडण्याकरिता सिंगल फोकस मूर्तीच्या मागे लावण्यासाठी एलईडी दिव्यांचे फिरते चक्र, एलईडी स्पॉट लाईट, क्रिस्टल लाईट, फ्लॉवर माळ, एलईडी पट्टा, सेंन्सर चक्री आदि प्रकारांना गणेशभक्तांकडून जास्त मागणी असल्याचे विक्रेता रोशन विश्वकर्मा यांनी सांगितले. त्याचबरोबर विविध प्रकारात असलेल्या लेसर बल्बनाही मागणी आहे. (वार्ताहर)