Join us  

मुंबईला चीनचा शॉक; वीजपुरवठा ठप्प होण्यामागे सायबर हल्ला

By ऑनलाइन लोकमत | Published: March 02, 2021 7:14 AM

मुंबईतील वीजपुरवठा खंडित होण्यामागे चिनी सायबर हल्ला असू शकतो, अशा आशयाचे वृत्त काही परदेशी माध्यमांनी दिले होते. त्यानंतर आज गृहमंत्री अनिल देशमुख आणि ऊर्जामंत्री नितीन राऊत यांनी संयुक्त पत्रकार परिषदेत माहिती दिली.

लोकमत न्यूज नेटवर्क मुंबई : मुंंबई महानगर क्षेत्रात चीनच्या सायबर हल्ल्यामुळे अचानक वीजपुरवठा खंडित झाल्याची शक्यता सायबर सेलने व्यक्त केली असल्याची माहिती गृहमंत्री अनिल देशमुख यांनी सोमवारी व्यक्त केली. १२ ऑक्टोबर रोजीची ही घटना आहे.

मुंबईतीलवीजपुरवठा खंडित होण्यामागे चिनी सायबर हल्ला असू शकतो, अशा आशयाचे वृत्त काही परदेशी माध्यमांनी दिले होते. त्यानंतर आज गृहमंत्री अनिल देशमुख आणि ऊर्जामंत्री नितीन राऊत यांनी संयुक्त पत्रकार परिषदेत माहिती दिली. १२ ऑक्टोबर रोजी मुंबईतील वीज खंडित झाल्यानंतर ऊर्जा विभागाने सायबर हल्ल्याची शक्यता वर्तविली  होती. त्यानंतर सायबर सेलने स्काडा सिस्टीमच्या माध्यमातून केलेल्या तपासणीत तो सायबर हल्ला असल्याचे निष्पण्ण झाले आहे. परदेशी अकाउंटमधून आठ जीबी डाटा राज्य विद्युत मंडळाच्या सर्व्हरमध्ये पाठविला; तसेच, प्रतिबंधित खात्यांतून विद्युत मंडळाच्या सर्व्हेमध्ये लाॅग इन करण्याचाही प्रयत्न झाला आहे. शिवाय, १४ ट्रोजन हार्सेस सर्व्हरमध्ये टाकले असावेत, असे अहवालात म्हटल्याचे देशमुख यांनी सांगितले. 

यासंदर्भात परदेशी माध्यमातील बातम्या सायबर सेलच्या निष्कर्षाला बळकटी देणाऱ्या आहेत, असे सांगून गृहमंत्री देशमुख म्हणाले,, रेकॉर्डेड फ्युचर नेटवर्क ॲनलिसिस या अमेरिकन कंपनीनेही याचा तपास केला होता. मुंबईच्या वीज यंत्रणेत मॉलवेअर घुसवण्याचा प्रयत्न करण्यात आल्याचे या कंपनीने आपल्या अहवालात म्हटले आहे. राज्य सायबर सेलचा संपूर्ण अहवाल पुढील कार्यवाहीसाठी देशमुख यांनी ऊर्जामंत्री राऊत यांच्याकडे सुपूर्द केला. 

नेमके काय झाले? गेल्या वर्षी १२ ऑक्टोबर रोजी मुंबईसह पूर्व आणि पश्चिम उपनगरातील अनेक भागांत वीज गायब झाली. लोकल सेवा ठप्प झाली. महापारेषणच्या कळवा-पडघा केंद्रात देखभाल-दुरुस्ती सुरू होती. त्या वेळी बिघाड होऊन मुंबई-ठाण्यातील मोठ्या भागाचा वीजपुरवठा बंद झाला. मुंबईचा वीजपुरवठा इतर भागापासून विलग करणारी यंत्रणाही विस्कळीत झाली. कित्येक तास मुंबई आणि परिसर विजेविना होता.

१२ ऑक्टोबरला कळवा - पडघा केंद्रात दुरुस्तीचे काम होते. यादरम्यान खारघर लाइनवर लोड आल्याने मुंबईची आयलॅडिंग कोसळून संपूर्ण मुंबई अंधारात होती. या प्रकरणात घातपाताचा संशय मी व्यक्त केला होता. त्यादृष्टीने सायबर सेलमार्फत चौकशीची विनंती केली होती. या अहवालाचा अभ्यास करून कार्यवाही करण्यात येणार असल्याचे राऊत यांनी या वेळी स्पष्ट केले.     - नितीन राऊत, ऊर्जामंत्री

 

टॅग्स :मुंबईवीजअनिल देशमुख