Join us  

बेस्ट कर्मचाऱ्यांच्या पगारात चिल्लर, समितीच्या बैठकीत उमटले तीव्र पडसाद

By ऑनलाइन लोकमत | Published: April 02, 2021 3:10 AM

तिकिटांचे भाडे पाच ते २० रुपये असल्याने बेस्टच्या बस आगारांमध्ये दररोज लाखो रुपयांची नाणी जमा होत असतात. मात्र, या सुट्या पैशांच्या निपटाऱ्यासाठी अद्याप कोणतीही सोय नाही.

मुंबई :  तिकिटांचे भाडे पाच ते २० रुपये असल्याने बेस्टच्या बस आगारांमध्ये दररोज लाखो रुपयांची नाणी जमा होत असतात. मात्र, या सुट्या पैशांच्या निपटाऱ्यासाठी अद्याप कोणतीही सोय नाही. त्यामुळे दररोज जमा होणारी लाखो रुपयांची नाणी कर्मचाऱ्यांना पगारातून देण्यात येत आहेत. प्रत्येक कर्मचाऱ्याला १५ हजार रुपयांपर्यंतचे वेतन पाच ते दहा रुपयांच्या नाणी स्वरूपात दिली जाते. याचे तीव्र पडसाद बेस्ट समितीच्या बैठकीत उमटले. बेस्ट उपक्रमाने भाडेकपात केल्यानंतर किमान भाडे पाच रुपये ते कमाल वीस रुपये एवढे आहे. बेस्टच्या बसगाड्यांमधून दररोज साधारणतः ३४ लाख मुंबईकर प्रवास करतात. लॉकडाऊनच्या काळात दररोज प्रवास करणाऱ्या प्रवाशांची संख्या अडीच लाख होती. मात्र, लॉकडाऊन शिथिल झाल्यानंतर गेल्या तीन महिन्यांपासून प्रवाशांची संख्या पुन्हा वाढली आहे. त्यामुळे दररोज पाच, दहा रुपयांची लाखो नाणी बेस्टच्या तिजोरीत जमा होत आहेत.  बस आगार आणि वडाळा येथील मध्यवर्ती केंद्रात दररोज येणारी पाच आणि दहा रुपयांची नाणी जमा करण्यासाठी बेस्टने जानेवारी महिन्यात कंत्राट केले होते. मात्र, त्यानुसार पुढे कोणतीही कार्यवाही झालेली नाही, असे बेस्ट समितीमध्ये भाजपचे सुनील गणाचार्य यांनी निदर्शनास आणले. दररोज बस आगारांमध्ये जमा होणारी नाणी पगार स्वरूपात ४० हजार बेस्ट कर्मचाऱ्यांना देण्यात येतात. यापैकी काही रक्कम रोख स्वरूपातही दिली जाते, अशी माहिती यावेळी देण्यात आली.

टॅग्स :मुंबईबेस्ट