चुलीवरची मिसळ
By Admin | Updated: June 7, 2015 01:11 IST2015-06-07T01:11:52+5:302015-06-07T01:11:52+5:30
एकूणच भारतीय शाकाहारी खाद्यान्न जितके रुचकर आहे तितकेच यातले बहुसंख्य पदार्थ पौष्टिकही आहेत.

चुलीवरची मिसळ
- राजेंद्र शिखरे
एकूणच भारतीय शाकाहारी खाद्यान्न जितके रुचकर आहे तितकेच यातले बहुसंख्य पदार्थ पौष्टिकही आहेत. विशेषत: महाराष्ट्रातील पाककृतींच्या चवीला तर बेमिसाल आणि अस्सल असे रांगडेपण आहे. त्या मानाने स्वस्त. तशा कमी कष्टात आणि वेळेत पण तुडुंब पोटभरल्याचे निखळ समाधान देणारे नानाविध चवींचे नवनवीन पदार्थ, खरं तर स्ट्रीट फूड बझार झोन्समध्येच जास्त मिळतात आणि हे तसं बहुजनमान्य वास्तव आहे. याच अवीट स्ट्रीट फूड परंपरेतील आणखी एक खमंग, खुसखुशीत आणि लोकमान्य चव आहे, 'चुलीवरची मिसळ.'
मुंबईत तशी अनेक ठिकाणी मिसळ मिळते. इथल्या यच्चयावत खाऊगल्ल्यांमधून. अनेक रस्त्यांच्या कोपऱ्यांवर अगदी अडचणी वळचणीतही कशा कोण जाणे पण नेमक्या मोक्याच्याच जागा अडवून दिवसरात्र उभ्या असलेल्या हातगाड्या किंवा ठेल्यांमधून. शहर आणि उपनगरातील लोकल रेल्वे स्टेशन्स. जागोजागचे अल्ट्रा मॉडर्न फूड मॉल्स. गिरगावातील तशी मोजकीच आणि दादरचं प्रकाश, जिप्सी विशेषत: ‘आस्वाद’ ही हॉटेल्स, ही या मिसळीसाठी कायम चर्चेत असतात, आहेत. यातल्याच आस्वाद या सेना भवनालगतच्या हॉटेलमधील मिसळीला, सर्वात रुचकर शाकाहारी पदार्थाचा जागतिक बहुमान प्राप्त झाला आहे. डेफिनेट्ली एव्हरीवन फील्स प्राऊड! महाराष्ट्राला त्याहीपेक्षा आमच्या या सर्वगुणसंपन्न, सतत सर्वसक्रिय, बेधडक, अजोड आणि बिनतोड ‘माझी मुंबईला’, चक्क जात, भाषा, प्रांतवाद झिडकारून, जागतिक पातळीवर निर्विवाद नेण्याचा समाधानकारक विक्रम आणि तोही भल्याभल्यांची निमित्तमात्र खवळती तोंडे तीही कशी निव्वळ तर्री-तडक्यानिशी बंद करणाऱ्या, आमच्या या अस्सल मराठमोळ्या मिसळीच्या नावे नोंदला गेला आहे. असो! कोल्हापुरी, पुणेरी, नाशिक बाजाची, गावरान अशा वेगवेगळ्या चवीत आणि नानाविध ठसक्यांची मिसळ, खरं तर आता देशभर उपलब्ध आहे. इतकंच कशाला, सेव्हन्थ किंवा फाइव्हस्टार्स फॅमिलीज किंवा हॉटेल्समधूनही आता बहुतेक वेळा नाश्त्यासाठी हटकून आणि आवडीने मिसळ मागितली जाते. अगदी आग्रहाने. आवडीने. मात्र सहसा शहरात फारशी न आढळणारी चुलीवरची मिसळ, ही या सगळ्या मिसळमेळ्याची बावन्नखणी नजाकती ठसक्याची लाजवाब राणी आहे असं म्हटलं, तर ती अतिशयोक्ती नाही. हां!
नाशिक, राजगुरू नगर खेड, सासवड या ठिकाणी आणि या शहर-गावांना जोडणाऱ्या काही रस्त्यांवरच्या धाब्यांवर ही 'स्पेशल चुलीवरची मिसळ' मिळतेच मिळते. माझ्या एका दीर्घानुभवी डॉक्टरांच्या म्हणण्यानुसार तर चुलीवरची मिसळ ही कोलेस्ट्रॉल लेस आहे. यात पोषक फाइबर्स आहेत आणि म्हणे बऱ्या प्रमाणात व्हिटॅमिन सी पण आहे. ही शात्रीय आणि आरोग्यअभ्यास क्लिष्टता जरा बाजूला ठेवली तर ही चुलीवरची मिसळ जातीच्या खवय्याला 'येडं' करून सोडते हे मात्र आंखो देखा त्रिवार सत्य आहे. तसं पाहायला गेलं तर चुलीवर भाजलेले, शिजवलेले एकूणच सगळे पदार्थ हे अधिक आरोग्यदायी आणि चविष्ट असतात. हे सिद्ध सत्य वेगळ्याने सांगायची गरज नाहीच. तशी ही चुलीवरची मिसळही बनवायला फारशी अवघड नाही. फारफार तर तीस मिनिटे लागतात.
काय लागतं या चुलीवरची मिसळीला तर ३ वाट्या मोड आलेली मटकी, ४ मोठे टणक लाल कांदे, २ वाट्या ओलं खोबरं, १ वाटी सुकं खोबरं, ३ इंचाचा आल्याचा तुकडा, २ लसणाचे गड्डे (सोलून वाटीभर व्हावा), १ जुडी टवटवीत कोथिंबीर, २ मोठे चमचे वाटलेली (दळलेली नाही) कोल्हापुरी कांदा-लसूण चटणी, १ मोठा चमचा गरम मसाला पावडर, २ चिरलेले बटाटे, मीठ, तेल, हिंग, हळद, तिखट. शक्य तो विहिरीचं किंवा आडाचं पाणी, भट्टीतून काढलेलं खरपूस फरसाण, बारीक चिरलेला कच्चा कांदा, कोथिंबीर आणि रसरशीत लिंबू. चला आता चूल पेटवा. चुलीवर जमलं तर ठोक्यांचं पितळी पातेलं ठेवा. पातेल्यात तेल जरा कडकच तापवून त्यात हिंग आणि हळद घाला. त्या तेलात मटकी आणि बटाटे टाकून परता. ही परत बुडेल इतकंच पाणी घेऊन हे सारण तिखट आणि मीठ घालून शिजवून घ्या.
आता कट किंवा या मिसळीसाठीचा रस्सा. कांदे उभे आणि किंचित पातळच चिरून घ्या. यातला वाटीभर कांदा बाजूला काढून उरलेला कांदा, दोन्ही खोबऱ्याची खवण (सुके आणि ओले), गरम मसाला तेलावर भाजून बारीक वाटून घ्या. आले, लसूण, कोथिंबीर एकत्र करून अशीच बारीक वाटा. वाटताना मात्र उगाच जास्त पाणी घालू नका. चुलीवरच पण जाड बुडाच्या पातेल्यात आधी १ वाटी तेल तापवून त्या काहीशा फसफसत्या तेलात हिंग, हळद आणि उभा चिरलेला तो वाटीभर कांदा, कोल्हापुरी मसाला चटणी टाकून लालसर आणि खमंग वास येईपर्यंत परता. मग आधी काढलेलं आणि हे अशी दोन्ही वाटणे घालून पुन्हा चांगलं परता. या परतणीत चवीच्या अंदाजाने मीठ आणि ४ कप पाणी घालून झक्क उकळा. थोडं आटू द्या. आता मिसळ प्लेट भरायची ती अशी. एका खोलगट प्लेटमध्ये २ मोठे चमचे फरसाण घ्या. त्यावर घसघशीत मटकी, कच्चा कांदा, कोथिंबीर पेरा. या मिश्रणावर आता आधी १ मोठी पळी जो रस्सा केलाय तो ओता. यावर लिंबू, ओलं खोबरं घाला. त्याच रश्याच्या वर तरंगता तेलथर एका वेगळ्या वाटीत घ्या आणि मिसळीच्या प्लेटबरोबर, दही, शेव, टोमॅटो आणि ब्रेडस्लाइस असं सर्व्ह करा. घाम फुटला तरी ही चुलीवरची मिसळ खाणारा आपल्या शर्टाच्या बाहीनं नाकपुड्या पुसतपुसत प्लेट चकाचक साफ केल्याशिवाय हटत नाही.