लहान मुलांच्या फुप्फुसांची कार्यक्षमता होतेय कमी

By Admin | Updated: May 5, 2015 02:39 IST2015-05-05T02:39:07+5:302015-05-05T02:39:07+5:30

हवेतील वाढत्या प्रदूषणामुळे मेट्रो सिटीमधील लहान मुलांच्या फुप्फुसांची कार्यक्षमता कमी होत असल्याचे एका सर्वेक्षणात आढळून आले

Children's lung function is reduced due to lack of efficiency | लहान मुलांच्या फुप्फुसांची कार्यक्षमता होतेय कमी

लहान मुलांच्या फुप्फुसांची कार्यक्षमता होतेय कमी

मुंबई : हवेतील वाढत्या प्रदूषणामुळे मेट्रो सिटीमधील लहान मुलांच्या फुप्फुसांची कार्यक्षमता कमी होत असल्याचे एका सर्वेक्षणात आढळून आले. दोन हजार शाळकरी मुलांपैकी ३५ टक्के मुलांच्या फुप्फुसांची कार्यक्षमता कमी झाली असल्याची बाब या सर्वेक्षणात उघड झाली आहे. बदलत्या जीवनशैलीमुळेदेखील फुप्फुसांच्या कार्यक्षमतेवर परिणाम होत असल्याचे तज्ज्ञांचे मत आहे.
दिल्ली, कोलकाता, बंगळुरू आणि मुंबई या चार शहरांतील १० ते १५ वयोगटातील दोन हजार मुलांच्या फुप्फुसांची तपासणी करण्यात आली होती. सर्वेक्षणात मुंबईतील ५७३ मुलांची तपासणी करण्यात आली होती. यापैकी २७ टक्के मुलांच्या फुप्फुसांची कार्यक्षमता कमी असल्याचे आढळून आले होते. तर दिल्लीत सर्वाधिक म्हणजे ४० टक्के मुलांच्या फुप्फुसांची कार्यक्षमता कमी असल्याचे आढळून आले आहे. हिल फाउंडेशनतर्फे ‘ब्रिद ब्लू २०१५’ हे सर्वेक्षण करण्यात आले.
दिल्लीतील ४० टक्के मुलांपैकी २१ टक्के मुलांच्या फुप्फुसांची क्षमता वाईट, तर १९ टक्के मुलांची क्षमता खराब आहे. बंगलोर येथील १४ टक्के मुलांच्या फुप्फुसांची क्षमता वाईट, तर २२ टक्के मुलांची क्षमता वाईट आहे. मुंबईतील २७ टक्के मुलांपैकी १३ टक्के मुलांची वाईट, तर १४ टक्के जणांची फुप्फुसाची स्थिती खराब आहे. कोलकाता येथील ३५ मुलांपैकी ९ टक्के मुलांच्या फुप्फुसांची क्षमता वाईट, तर २६ टक्के मुलांची खराब स्थिती असल्याचे सर्वेक्षणात स्पष्ट झाले आहे.
फुप्फुसात किती प्रमाणात हवा साठविली जाते, फुप्फुसातून हवा किती पटकन बाहेर पडते याची तपासणी करण्यात आली होती. यामुळे आॅक्सिजन घेऊन कार्बनडायआॅक्साइड कशा प्रकारे बाहेर पडतो हे समजले.
लहान वयात फुप्फुसांची कार्यक्षमता कमी झाल्याने भविष्यात श्वसनविकार उद्भवणे, अस्थमासारखा आजार होण्याची भीती बळावते. हवेतील वाढत्या प्रदूषणामुळे मुलांमध्ये हा त्रास वाढत असल्याचे दिसून आले आहे. आवरण नसलेल्या वाहनांवरून प्रवास करणाऱ्या मुलांना याचा धोका अधिक असल्याचे मत श्वसनविकार तज्ज्ञ डॉ. संजीव मेहता यांनी व्यक्त केले.
वाढत्या प्रदूषणाबरोबरीनेच बदलत्या जीवनशैलीमुळेही लहान मुलांमध्ये दम्याचा त्रास वाढतो. घरात असणारे सोफासेट, कारपेट, पडद्यांवर वातावरणातील धुळीचे कण असतात. दम्याच्या त्रासासाठी असे वातावरण पोषक असते.
लहान मुलांची रोगप्रतिकारक शक्ती कमी असल्यामुळे मुलांच्या फुप्फुसावर रोगजंतू ताबा
मिळवतात. पाळीव प्राण्यांमुळेही दम्याचा त्रास वाढतो, असे श्वसनविकार तज्ज्ञ डॉ. अभय उपे यांनी सांगितले. (प्रतिनिधी)

Web Title: Children's lung function is reduced due to lack of efficiency

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.