मुलांचे कान भरणे पडले महागात

By Admin | Updated: October 5, 2015 02:54 IST2015-10-05T02:54:28+5:302015-10-05T02:54:28+5:30

मुलाला वडिलांबरोबर राहण्यास न्यायालयाने परवानगी देऊ नये, यासाठी वडिलांविरुद्ध मुलाचे कान भरणाऱ्या आईची कुटुंब न्यायालयाने चांगलीच कानउघाडणी केली

Children's ears fell in the expensive | मुलांचे कान भरणे पडले महागात

मुलांचे कान भरणे पडले महागात

मुंबई: मुलाला वडिलांबरोबर राहण्यास न्यायालयाने परवानगी देऊ नये, यासाठी वडिलांविरुद्ध मुलाचे कान भरणाऱ्या आईची कुटुंब न्यायालयाने चांगलीच कानउघाडणी केली. गणेशोत्सव साजरा करण्यासाठी वडिलांना तीन तासांसाठी मुले घरी नेण्याची परवानगी दिली, तर मुलांना मानसोपचारतज्ज्ञांकडे नेण्याचे आदेश आईला दिले.
मुलांनी गणेशोत्सव आपल्या घरी साजरा करावा, यासाठी व्यवसायाने डॉक्टर असलेल्या अमित पावसकर (बदलेले नाव) यांनी १७ व १८ सप्टेंबर रोजी मुलांचा ताबा आपल्याकडे द्यावा, यासाठी कुटुंब न्यायालयात अर्ज केला होता. मात्र मुलांनी वडिलांची भीती वाटते, असे न्यायाधीशांना सांगितले. त्यामुळे न्यायालयाने मुलांना केवळ ३ तास घरी नेण्याची परवानगी पावसकर यांना दिली. त्यावर अनिता पावसकर (बदलेले नाव) यांनी आक्षेप घेतला. दोन्ही मुले वडिलांना घाबरतात, त्यामुळे ते वडिलांबरोबर जाणार नाहीत, असे अनिता यांनी न्यायालयाला सांगितले. न्यायाधीशांनी १२ आणि नऊ वर्षांच्या दोन्ही मुलांना चेंबरमध्ये मुलाखतीसाठी बोलावले. १२ ते १९ दरम्यान शाळेला सुटी असल्याने तुम्ही सुटी कशी घालवणार, अशी विचारणा न्यायाधीशांनी केल्यावर मुलांनी आपल्याला वडिलांबरोबर जायचे नाही, असे सांगितले.
वडिलांबरोबर न जाण्याचे कारण विचारले असता, दोन्ही मुले उत्तरे देऊ शकली नाहीत. वडिलांना चेंबरमध्ये बोलावले तर त्यांना बोलावू नका, असे मोठ्याने ओरडू लागले. वडील सतत ओरडतात, असे कारण त्यांनी दिले, असे निरीक्षण न्यायालयाने नोंदवले. वडील चेंबरमध्ये आले तेव्हा दोन्ही मुलांनी वडिलांकडे पाहिलेही नाही. वडिलांनी बोलण्याचा प्रयत्न केला तर त्यांनी त्यांच्याशी संवाद साधण्यास नकार दिला. त्यावर पावसकर यांनी काही महिन्यांपूर्वी मुलांबरोबर सहलीला गेल्याचे फोटो दाखवत त्यावेळी मुले आपल्याबरोबर आनंदी असल्याचे न्यायालयाला सांगितले.
मुलांना वडिलांकडे जायचे आहे की नाही, यासंदर्भात न विचारताही मुलांनी वडिलांकडे न जाण्याचा घोशा लावला. यावरून या दोन्ही मुलांना आईने तसे ‘शिकवले’ असून, आईचे त्यांच्यावर नियंत्रण आणि प्रभाव असल्याचे स्पष्ट होते, असे निरीक्षण नोंदवत न्यायालयाने मुलांना मानसोपचारतज्ज्ञांकडे नेण्याचे निर्देश आईला दिले. (प्रतिनिधी)

Web Title: Children's ears fell in the expensive

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.