गरजू मुलांना मिळणार निःशुल्क डिजिटल आरोग्य सेवा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 17, 2021 04:07 IST2021-07-17T04:07:05+5:302021-07-17T04:07:05+5:30
मुंबई : वंचित वर्गातील मुलांना वैद्यकीय मदत पुरविण्यात यावी म्हणून अपोलो हॉस्पिटल्स फाैंडेशनने 'सेविंग अ-चाईल्डस् हेल्थ इनिशिएटिव्ह'अंतर्गत प्रत्येक मुलाला ...

गरजू मुलांना मिळणार निःशुल्क डिजिटल आरोग्य सेवा
मुंबई : वंचित वर्गातील मुलांना वैद्यकीय मदत पुरविण्यात यावी म्हणून अपोलो हॉस्पिटल्स फाैंडेशनने 'सेविंग अ-चाईल्डस् हेल्थ इनिशिएटिव्ह'अंतर्गत प्रत्येक मुलाला आरोग्य सेवा मोफत देणार आहे. याठिकाणी १६ वर्षांपेक्षा कमी वयाच्या गरजू मुलांना आपल्या घरूनच विविध केंद्रांमधून डिजिटल सल्ला मिळवता येऊ शकेल. यासाठी त्यांना कोणतेही शुल्क भरावे लागणार नाही.
अपोलो २४/ ७ डिजिटल प्लॅटफॉर्ममार्फत एक वर्षभरासाठी (७ जुलै २०२२ पर्यंत) अपोलो हॉस्पिटल्सच्या बालरोग तज्ज्ञांचा सल्ला निःशुल्क उपलब्ध असणार आहे. यामार्फत बालकांच्या उत्तम आरोग्याचा पाया रचला जावा, हे 'सेविंग अ चाईल्डस् हेल्थ इनिशिएटिव्ह' या लहान मुलांसाठी काम करणाऱ्या स्वयंसेवी संघटनेचे लक्ष्य आहे. याअंतर्गत १८० पेक्षा जास्त बालरोगतज्ज्ञ 'साची'च्या या नव्या उपक्रमात सहभागी होणार आहेत.
अपोलो फाैंडेशनच्या उपाध्यक्षा उपासना कामिनेनी कोनीडेला यांनी सांगितले की, डॉ संगीता रेड्डी या नेहमीच लहान मुलांच्या आरोग्याविषयी अतिशय जागरूक आणि संवेदनशील असतात. यासंदर्भातील त्यांच्या संकल्पना आणि आमच्या बालरोग तज्ज्ञांकडून मिळत असलेला सहयोग यामुळे आम्हाला देशभरातील वंचित समुदायांमधील लहान मुलांना आरोग्यसेवा निःशुल्क पुरवण्यात मदत मिळत आहे. मुलांचे लसीकरण झालेले नसल्याने त्यांच्या आरोग्याला सर्वाधिक धोका आहे. लिंक शेअर करण्यासाठी लोकांना प्रोत्साहन देऊन आणि या उपक्रमाचे लाभ जास्तीत जास्त व्यक्तींपर्यंत पोहोचवून आपण देखील यामध्ये योगदान दिले पाहिजे. निरोगी राहा, सुरक्षित राहा. आम्ही आपल्या मदतीसाठी सदैव तत्पर आहोत.