निवडणुकीच्या प्रचारातही बालकामगार

By Admin | Updated: October 8, 2014 23:19 IST2014-10-08T23:19:45+5:302014-10-08T23:19:45+5:30

मुलांना काम नको, शिक्षण द्या असा नारा देणारे विविध पक्षांचे उमेदवारच प्रचारासाठी सर्रास बालकामगारांची मदत घेत असल्याचे सध्या दिसून येत आहे

Child workers in election campaign | निवडणुकीच्या प्रचारातही बालकामगार

निवडणुकीच्या प्रचारातही बालकामगार

शैलेश चव्हाण, तळोजा
मुलांना काम नको, शिक्षण द्या असा नारा देणारे विविध पक्षांचे उमेदवारच प्रचारासाठी सर्रास बालकामगारांची मदत घेत असल्याचे सध्या दिसून येत आहे. निवडणुकीच्या प्रचारासाठी दिवसेंदिवस वाढत चाललेला खर्च, पैसे देऊनही कामगारांची जाणवणारी वानवा यामुळे कमी खर्चात बालमजूर परवडणारे असल्याने त्यांचा प्रचाराच्या कार्यात सर्रास फायदा उठविला जात आहे.
उमेदवारांची पत्रके वाटण्यापासून प्रचार रॅलीत सहभाग घेणे, कार्यक्रमठिकाणी मान्यवरांची उठबस, सभांच्या ठिकाणची धावपळ यासाठी सध्या उमेदवारांना मोठी मॅनपॉवर लागत आहे. अशावेळी कार्यकर्त्यांचीही बोलीवर चांगलीच आदानप्रदान होते. मात्र बऱ्याचदा हे भाव परवडणारे नसल्याने बालमजुरीला विरोध करूनही कायद्याचा अवमान करत मुलांचे प्रचारकार्यात सहकार्य घेतले जात आहे. दिवसाचे चांगलेच पैसे मिळणार या आशेने मुले शाळांनाही दांड्या मारून या कार्यात उतरली आहेत.
कळंबोलीसह इतर परिसरातील सध्या विधानसभा उमेदवारांच्या कार्यकर्त्यांवर प्रचाराची सर्वात मोठी मदार असल्याचे दिसून येत आहे. यासाठी उमेदवार कार्यकर्त्यांना मोठ्या प्रमाणात पॅकेजेस दिली जात आहेत, मात्र कार्यकर्त्यांच्या काम सरो आणि वैद्य मरोच्या भावनेमुळे अगदी अल्प दरात पैशाचे आमिष दाखवून १२ ते १४ वयोगटातील मुले उमेदवारांचा प्रचार डोअर टू डोअर करताना दिसत आहेत. यासाठी त्यांना दिवसाचा ४००- ५०० रुपयांचा आकडा सांगून ऐनवेळी केवळ १५० - २०० रुपयेच दिले जात असल्याचे समजते. कळंबोली, कामोठा, पनवेल, खारघर परिसरात कार्यकर्त्यांनी ही शक्कल लढविली असल्याने बालकामगार खाऊच्या पैशासाठी काम करू लागले आहेत. पार्टी आॅफिसमधून २००० रंगीत छपाई केलेले कागद वाटण्यासाठी देतात. ते वाटून झाल्यावर ३०० रुपये देऊ असे सांगून १५० रुपयेच हातावर ठेवून खाऊ खा, असे सांगितले जात असल्याचे एका विद्यार्थ्याने सांगितले.

Web Title: Child workers in election campaign

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.