बालमजुराला मारहाण करणारा ताब्यात
By Admin | Updated: October 28, 2014 02:01 IST2014-10-28T02:01:30+5:302014-10-28T02:01:30+5:30
व्यवस्थित सांभाळ करेन, या बोलीवर बिहारमधील एका दाम्पत्याच्या मुलाला मुंबईत आणून बालमजुरीच्या खाईत लोटणा:या राजदीप चौधरी याला घाटकोपर पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

बालमजुराला मारहाण करणारा ताब्यात
मुंबई : व्यवस्थित सांभाळ करेन, या बोलीवर बिहारमधील एका दाम्पत्याच्या मुलाला मुंबईत आणून बालमजुरीच्या खाईत लोटणा:या राजदीप चौधरी याला घाटकोपर पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. त्याला न्यायालयीन कोठडी ठोठावली असून, आणखी दोन बालमजुरांची सुटका केली आहे. शिवाय पळून गेलेल्या दोन बालमजुरांचा शोध सुरू असून, बिहारमधील पीडित मुलावर घाटकोपर येथील राजावाडी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
बिहार राज्यातील बखरी गावातील रहिवासी असलेला 11वर्षीय समीर (नाव बदललेले) याला राजदीप चौधरी याने कामानिमित्त मुंबईत आणले होते. समीरला चांगले काम देऊ. त्यांचा चांगला सांभाळ करू, अशी बोलणी त्याने त्याच्या घरच्यांशी केली होती. मात्र घाटकोपरच्या अमृतनगर येथील जीन्सला चेन लावण्याच्या कारखान्यात त्याला कामाला ठेवले. तसेच कारखान्यात पाणी भरणो, जेवण बनविणो इथपासून ते घरातील साफसफाई करणो, अशीही कामे त्याला करावी लागत. दिवसाचे 16 तास काम आणि नीट आरामही नाही, अशी समीरची अवस्था झाली. शिवाय चौधरीने त्याला उपाशी ठेवण्यापासून मारहाण करण्यासदेखील सुरुवात केली.
शुक्रवारी मात्र चौधरीने हद्द ओलांडली. काम पूर्ण न केल्याने आणि एका पॅण्टची चेन व्यवस्थित न लावल्याने समीरला जबर मारहाण केली. उपाशी ठेवले. बंद खोलीत दोन दिवस डांबून ठेवले होते. रविवारी सकाळी नैसर्गिक विधीसाठी खोलीबाहेर पडलेला समीर बेशुद्ध होऊन शौचालयाबहेर पडला. आणि त्याची ही करुण अवस्था पाहून स्थानिकांनी त्याला उपचारासाठी राजावाडी रुग्णालयात दाखल केले. समीरकडे अधिक विचारणा केली असता ही धक्कादायक बाब समोर आली. आता त्याची प्रकृती स्थिर असली तरी त्याच्या शरीरावर काही जखमा आहेत. डोक्यावर दोन टाके पडले आहेत. परंतु अजून काही तपासण्या करण्यात येणार आहेत, असे रुग्णालयाच्या वैद्यकीय अधीक्षक डॉ. विद्या ठाकूर यांनी सांगितले.
घाटकोपर पोलिसांनी स्थानिकांच्या मदतीने चौधरी याला ताब्यात घेतले. चौधरी याने गुन्ह्याची कबुली दिली असून, त्याच्या कारखान्यातून इतर दोन बालमजुरांचीही सुटका केली. मात्र इतर जे दोघे जण पळून गेले आहेत त्यांचा शोध सुरू आहे, अशी माहिती घाटकोपर चिरागनगर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक वसंत पाटील यांनी दिली. समीरच्या आईवडिलांना मुंबईत आणण्यासाठीचे प्रयत्न पोलिसांमार्फत सुरू आहेत.