कर्जतमध्ये अनाथाश्रमात बाललैगिक अत्याचार

By Admin | Updated: May 28, 2014 14:32 IST2014-05-28T14:27:34+5:302014-05-28T14:32:21+5:30

अनाथ मुला-मुलींचा शिक्षणासह सांभाळ करणार्‍या कर्जत तालुक्यातील टाकवे या गावातील चंद्रभागा चॅरिटेबल ट्रस्टच्या अनाथाश्रमात मुलामुलींचे मानसिक आणि लैंगिक शोषण झाल्याचा प्रकार उघडकीस आला आहे.

Child abuse atrocities in orphanages in Karjat | कर्जतमध्ये अनाथाश्रमात बाललैगिक अत्याचार

कर्जतमध्ये अनाथाश्रमात बाललैगिक अत्याचार

कर्जतमधील प्रकार : आश्रम चालकाला अटक

 

अलिबाग : चार वर्षांवरील अनाथ मुला-मुलींचा शिक्षणासह सांभाळ करणार्‍या कर्जत तालुक्यातील टाकवे या गावातील चंद्रभागा चॅरिटेबल ट्रस्टच्या अनाथाश्रमात मुलामुलींचे मानसिक आणि लैंगिक शोषण झाल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी चंद्रभागा चॅरिटेबल ट्रस्टचा विश्‍वस्त आणि अनाथाश्रमाचा संचालक अजित चंद्रकांत दाभोळकर आणि त्याला साथ देणारी ललिता भगवान तोंडे या जोडगोळीला पुण्यातील जागरूक सामाजिक कार्यकर्त्या डॉ. अनुराधा सहस्रबुद्धे यांनी पाठपुरावा केल्यानंतर कर्जत पोलिसांनी अटक केली. या अनाथाश्रमात या मुलामुलींना आणून त्यांच्यासोबत लैंगिक चाळे करून त्याच्या पोर्नोग्राफीक फिल्म्स तयार करण्याचा प्रकार गेल्या १२ वर्षांपासून चालू असल्याचेही समोर आले आहे.
दोन मुले सापडली छाप्यात
चाईल्ड लाइनकडे याबाबत तक्रार आल्यावर ती पुढे डॉ. सहस्रबुद्धे यांच्याकडे आली. त्यांनी कर्जतमधील दिशा बालहक्क संस्थेशी तसेच महिला व बालकल्याण विभागाशी संपर्क साधून सोमवारी कर्जत पोलीस स्टेशन गाठले. कर्जत पोलिसांना मुळात हा ट्रस्ट आणि बेकायदा अनाथाश्रम कुठे आहे हे माहीत नव्हते, परंतु अजित दाभोळकर यांच्याबाबत ही तक्रार असल्याचे सांगितल्यावर दाभोळकर चांगला माणूस असल्याचे प्रमाणपत्र कर्जत पोलिसांनी दिल्यावर डॉ. सहस्रबुद्धे यांना मोठा धक्काच बसला. 
अखेर स्वत: सहस्रबुद्धे, महिला व बालकल्याण विभागाचे अधिकारी व कर्जत पोलीस अजित दाभोळकर याच्या तथाकथित अनाथाश्रमात छापा घालण्यासाठी पोहोचले असता, तेथे दोन मुलांना चक्क डांबून ठेवलेल्या अवस्थेत पाहायला मिळाले. मात्र पोलीस येत असल्याचे आधीच कळल्याने चित्रीकरणाची यंत्रणा तेथून गायब केल्याचे स्पष्टपणे दिसून आले. दाभोळकरच्या बंगल्याचे काम येथे सुरू असून, तेथे याच बालकांकडून काम करून घेण्यात येत असल्याचेही निष्पन्न झाल्याचे त्यांनी सांगितले.
चंद्रभागा चॅरिटेबल ट्रस्टचा विश्‍वस्त व बेकायदा अनाथाश्रमाचा संचालक मूळ पुण्यातील कोथरूड येथे राहणारा अजित दाभोळकर आणि या सर्व गैरप्रकारात त्याला साथ देणारी ललिता भगवान तोंडे या दोघांवर बाल अत्याचार व लैंगिक शोषण प्रतिबंधात्मक कायदा, बालमजुरी कायदा यासह भा.दं.वि. कलम ३७७, ३५४, ५0९, ३४२ अन्वये गुन्हा दाखल करून, या दोघांना आज न्यायालयासमोर हजर केले असता, त्यांना ५ जूनपर्यंत कोठडीत ठेवण्याचे आदेश देण्यात आले असल्याची माहिती पोलीस अधीक्षक अंकुश शिंदे यांनी दिली. 

लैंगिक अत्याचाराच्या धक्क्यात मुले-मुली
- बाल व महिला संरक्षणविषयक काम करणार्‍या पुण्यातील ज्ञानदेवी संस्थेच्या प्रमुख डॉ. अनुराधा हेमंत सहस्रबुद्धे यांच्या परिचयातील एका घरकाम करणार्‍या महिलेच्या माध्यमातून हा गैरप्रकार त्यांना समजला. 
- त्या घरकाम करणार्‍या महिलेची मुलगी मे महिन्याच्या सुट्टीच्या निमित्ताने घरी आल्यावर, तिने या लैंगिक अत्याचाराबाबतची माहिती आपल्या आईला दिली. त्यानंतर त्या घरकाम करणार्‍या महिलेने ही माहिती डॉ. सहस्रबुद्धे यांना सांगितली. 
- त्यावर डॉ. सहस्रबुद्धे यांनी यापैकी ११ ते १५ वयोगटातील अत्याचारित चार बालकांचे जबाब लिहून घेतले. पाचवे बालक अद्याप त्या लैंगिक अत्याचाराच्या धक्क्यातून सावरलेलेच नसल्याने, ते कोणतीही माहिती देण्यास धजावत नसल्याचे डॉ. सहस्रबुद्धे यांनी सांगितले.
(विशेष प्रतिनिधी) 

 

Web Title: Child abuse atrocities in orphanages in Karjat

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.