मुख्यमंत्र्यांच्या बंदोबस्तातील पोलिसाला ट्रकने उडविले
By Admin | Updated: September 25, 2014 00:24 IST2014-09-24T23:00:14+5:302014-09-25T00:24:00+5:30
कऱ्हाडला अपघात : उपचारादरम्यान पोलीस कर्मचाऱ्याचा मृत्यू

मुख्यमंत्र्यांच्या बंदोबस्तातील पोलिसाला ट्रकने उडविले
कऱ्हाड/मलकापूर : मुख्यमंत्र्यांचा ताफा जात असताना महामार्गावरील वाहतूक रोखण्यास गेलेल्या पोलिसाला भरधाव ट्रकने उडविले़ त्यामध्ये गंभीर जखमी झालेल्या पोलीस कर्मचाऱ्याचा उपचारादरम्यान तीनच तासांत मृत्यू झाला़ कऱ्हाडनजीक आज, बुधवारी दुपारी १२ वाजण्याच्या सुमारास हा अपघात झाला़ संतोष निवृत्ती गवळी (वय ४२, मूळ रा़ कुमठे, ता़ कोरेगाव, सध्या रा़ पोलीस सदनिका, कऱ्हाड) असे अपघातात ठार झालेल्या पोलीस कर्मचाऱ्याचे नाव आहे़
महामार्ग पोलीस दलात संतोष गवळी हे नाईक या पदावर कार्यरत होते़ आज मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण कऱ्हाड दौऱ्यावर असल्यामुळे सकाळी दहा वाजताच शहर, तालुका व महामार्ग पोलीस ठाण्यांतील कर्मचाऱ्यांना नेमून दिलेल्या बंदोबस्ताच्या ठिकाणी बोलविण्यात आले होते़
संतोष गवळी यांना पाटण-तिकाटणे येथे ज्याठिकाणी उपमार्ग महामार्गाशी जोडला गेला आहे, त्या पॉइंटवर ड्यूटी होती़ गवळी हे ११ वाजल्यापासून त्याठिकाणी थांबून होते़ दुपारी १२ वाजण्याच्या सुमारास मुख्यमंत्री चव्हाणांचा गाड्यांचा ताफा पाटण-तिकाटणे ओलांडून उपमार्गावरून महामार्गाकडे निघाला़ त्यावेळी गवळी हे महामार्गावरील वाहतूक रोखण्यासाठी सातारा-कोल्हापूर लेनवर धावले़
ते महामार्गावर वाहनांना थांबण्याचा इशारा करीत असतानाच भरधाव ट्रकने (केए ५२ - ५५३५) त्यांना धडक दिली़ चालकाने ट्रक न थांबविता तेथून पोबारा केला़ इतर पोलिसांनी पाठलाग करून संबंधित ट्रक मलकापूरच्या हद्दीत खरेदी-विक्री पंपासमोर अडविला़ ट्रकचालक आशिषकुमार अच्छेलाल यादव (रा़ नवापूर-बिबीपूर, जि़ आझमगढ, उत्तर प्रदेश) याला पोलिसांनी ताब्यात घेऊन अटक केली़
अपघातात गंभीर जखमी होऊन महामार्गावर पडलेल्या पोलीस नाईक संतोष गवळी यांना मुख्यमंत्र्यांच्या ताफ्यातीलच रुग्णवाहिकेतून तातडीने सह्याद्री रुग्णालयात हलविण्यात आले़ त्याठिकाणी त्यांच्यावर उपचार सुरू असताना दुपारी तीन वाजण्याच्या सुमारास त्यांचा मृत्यू झाला़ अपघाताची नोंद कऱ्हाड शहर पोलिसांत झाली आहे़ (प्रतिनिधी)
मुख्यमंत्रीही अपघातस्थळी थांबले
मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या ताफ्यापासून काही अंतरावरच हा भीषण अपघात झाला़ अपघात पाहताच मुख्यमंत्री चव्हाण यांचा ताफा थांबला़ मुख्यमंत्री आपल्या वाहनातून खाली उतरले़ गंभीर जखमी झालेल्या पोलीस नाईक गवळी यांना ताफ्यातीलच एका रुग्णवाहिकेतून रुग्णालयात हलविण्याची सूचना त्यांनी केली़