Join us  

मुख्यमंत्र्यांची ऑडिओ क्लिप प्रकरण : साम, दाम, दंड, भेदचा अर्थ मुख्यमंत्र्यांनी सांगावा - उद्धव ठाकरे

By ऑनलाइन लोकमत | Published: May 27, 2018 1:12 PM

पालघर लोकसभा मतदारसंघातील पोटनिवडणुकीवरून शिवसेना आणि भाजपा यांच्यात सध्या सुरू असलेले द्वंद्व दिवसेंदिवस अधिक तीव्र होत असल्याचे दिसत आहे.

मुंबई - पालघर लोकसभा मतदारसंघातील पोटनिवडणुकीवरून शिवसेना आणि भाजपा यांच्यात सध्या सुरू असलेले द्वंद्व दिवसेंदिवस अधिक तीव्र होत असल्याचे दिसत आहे. शुक्रवारी झालेल्या जाहीर सभेत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची  एक सनसनाटी ऑडिओ क्लिप उपस्थितांना ऐकवली. या प्रकरणी भाजपा कारवाई करणार असल्याचे बोलले जात आहे.  भाजपाकडून कारवाईची भाषा वापरण्यात आल्यानं शिवसेनेनं देखील आता अंगावर आल्यानं भाजपाला शिंगावर घ्यायचे ठरवल्याचे दिसत आहे.

'ऑडिओ क्लिप माझीच होती, पण त्यातील शेवटचे वाक्य त्यांनी सादर केलं नाही. अन्यथा तोंडावर पडले असते,' असं प्रत्युत्तर देणाऱ्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना उद्धव ठाकरे यांनी आव्हान दिलं आहे. 

कारवाईबाबत उद्धव ठाकरे यांना विचारलं असता ते म्हणाले की, ''भाजपाला जर कारवाई करायची असेल तर करू द्या''.  ते पुढे असंही म्हणाले की, ऑडिओ क्लिपमध्ये मुख्यमंत्र्यांचा आवाज आहे, तो समोर आणला.

शिवाय, ''कूटनीती, साम-दाम-दंड-भेदचा अर्थ काय?, अर्थ समजण्यासाठी आम्ही मुख्यमंत्र्यांकडून मराठी शिकण्यास तयार आहोत'', अशा शब्दांत हल्लाबोल चढवत उद्धव ठाकरे यांनी क्लिपमध्ये कशा प्रकारे छेडछाड झाली तेदेखील उडघ करावं, असं आव्हानही  भाजपाला दिलं आहे.

(उद्धव ठाकरेंकडून भर सभेत मुख्यमंत्र्यांची सनसनाटी ऑडिओ क्लीप सादर)

दरम्यान, संबंधित ऑडिओ क्लिपमध्ये देवेंद्र फडणवीस कार्यकर्त्यांना पालघरची निवडणूक जिंकण्यासाठी साम, दाम, दंड, भेदाचा वापर करण्याची सूचना देत आहेत. आपल्याला प्रचंड मोठी लढाई लढायची असून कोणी आपल्या अस्तित्वाला आव्हान देत असेल, विश्वासघात करत असेल तर त्याला तसेच उत्तर दिले पाहिजे. आपल्याला मोठा अॅटॅक केला पाहिजे. कोणी दादागिरी करत असेल तर त्यांना जशास तसे उत्तर द्या. मी तुमच्यामागे ताकदीने आणि खंबीरपणे उभा आहे. 'अरे ला कारे'च करायचं.. 'अरे ला कारे' मध्येच उत्तर द्यायचं हे आपण लक्षात ठेवलं पाहिजे, असे मुख्यमंत्र्यांनी या क्लिपमध्ये म्हटले आहे. मात्र, भाजपाने या ऑडिओ क्लिपमध्ये फेरफार करण्यात आल्याचा दावा केला आहे. या ऑडिओ क्लिपची दखल घेऊन निवडणूक आयोगाने कारवाई करावी, अशी मागणी उद्धव यांनी केली आहे. 

(मुख्यमंत्र्यांनी संपूर्ण ऑडिओ ऐकवला....)

तर दुसरीकडे, शनिवारी (26 मे) देवेंद्र फडणवीस यांनी या क्लिपच्या सुरुवातीचा आणि शेवटचा भाग वसईतील जाहीर सभेत ऐकवला आणि शिवसेनेचा डाव त्यांच्यावरच उलटवला. 'आपण सगळ्या गोष्टी सांभाळण्याकरता सक्षम आहोत. आपण सरकार पक्ष आहोत. पण सत्तेचा कधीच दुरुपयोग करत नाही. मात्र, असा दुरुपयोग कुणी करायचा प्रयत्न केला तर त्याला सोडणार नाही, ही मानसिकता निवडणुकीत ठेवली पाहिजे', हे त्याच ऑडिओ क्लिपमधील पुढचे संवाद मुख्यमंत्र्यांनी ऐकवले आणि शिवसेनेवर पलटवार केला. पराभव दिसतो, तेव्हाच अशा स्तरावर जावं लागतं, साम-दाम-दंड-भेद याचा अर्थ कूटनीती असा होतो, असं सुनावत, आपण स्वतःच ही ऑडिओ क्लिप निवडणूक आयोगाला देणार असल्याचं मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केलं. 

ही होती शिवसेनेने ऐकवलेली ऑडिओ क्लीप

एक प्रचंड मोठी लढाई आपल्याला लढायची आहे... आपल्या अस्तित्वाला जर कोणी त्या ठिकाणी आव्हान देत असेल आणि आपल्याशी विश्वासघात करत असेल, एखादा पक्ष आपला मित्र म्हणता म्हणता आपल्या पाठीत खंजीर खुपसत असेल, तर आपण कशाप्रकारे रिअॅक्ट केलं पाहिजे?...

ज्याच्या रक्तामध्ये भाजप आहे, तो आता शांत बसूच शकत नाही...

आता एवढा मोठा अटॅक आपण केला पाहिजे की भाजप काय आहे हे त्यांना लक्षात आलं पाहिजे...

ज्यावेळी मी सांगतो तेव्हा हे लक्षात ठेवा... साम, दाम, दंड, भेद...

ही निवडणूक जर जिंकायची असेल तर जशास तसं उत्तर दिलं पाहिजे. कुणाची दादागिरी मी चालू देणार नाही. कुणी दादागिरी करायचा प्रयत्न केला तर त्यापेक्षा जास्त मोठी दादागिरी मला करता येते, हे आपण सर्वांनी लक्षात ठेवलं पाहिजे...

तेव्हा तुमच्या पाठीशी ताकदीनं आणि खंबीरपणे मी उभा आहे. 'अरे ला कारे'च करायचं. 'अरे ला कारे' मध्येच उत्तर द्यायचं हे आपण लक्षात ठेवलं पाहिजे...

टॅग्स :उद्धव ठाकरेदेवेंद्र फडणवीसपालघर पोटनिवडणूक 2018