Join us  

कोम्बिंग आॅपरेशन थांबविण्याचे मुख्यमंत्र्यांचे आश्वासन - प्रकाश आंबेडकर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 05, 2018 3:56 AM

कोरेगाव-भीमा हिंसाचाराविरोधात पुकारण्यात आलेल्या महाराष्ट्र बंदनंतर पोलिसांनी दलित तरुणांची धरपकड सुरू केली आहे. हे अटकसत्र थांबविण्याच्या मागणीसाठी भारिप बहुजन महासंघाचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी गुरुवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली.

मुंबई  - कोरेगाव-भीमा हिंसाचाराविरोधात पुकारण्यात आलेल्या महाराष्ट्र बंदनंतर पोलिसांनी दलित तरुणांची धरपकड सुरू केली आहे. हे अटकसत्र थांबविण्याच्या मागणीसाठी भारिप बहुजन महासंघाचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी गुरुवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. मुख्यमंत्र्यांनी कोम्बिंग आॅपरेशन थांबविण्याचे आश्वासन दिल्याची माहिती आंबेडकर यांनी भेटीनंतर आयोजित पत्रकार परिषदेत दिली.कोरेगाव-भीमा हिंसाचाराचा निषेध करण्यासाठी दलित आणि डाव्या संघटनांनी बुधवारी राज्यव्यापी बंद पुकारला होता. या संघटनांच्या प्रमुख मागण्यांसंदर्भात प्रकाश आंबेडकर यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने आज मुख्यमंत्री फडणवीस यांची भेट घेतली. आंबेडकर यांच्यासह विवेक कुलकर्णी आणि महेंद्र सिंग आदी नेते होते. शिष्टमंडळाने केलेल्या सर्व प्रमुख मागण्या मुख्यमंत्र्यांनी मान्य केल्याचे आंबेडकर यांनी पत्रकार परिषदेत सांगितले. दलित आणि डाव्या संघटनांनी पुकारलेल्या या आंदोलनात दलितांबरोबर इतर विविध समाजातील लोकांचाही सहभाग होता.बंदनंतर मुंबई आणि औरंगाबादमध्ये सुरू असलेले ‘कोम्बिंग आॅपरेशन’ थांबवण्याचे आश्वासन मुख्यमंत्र्यांनी दिले आहे. कोरेगाव-भीमा घटनेला जबाबदार असणाºयांना अटक करण्याचे मुख्यमंत्र्यांनी मान्य केले आहे. या घटनेच्या चौकशीसाठी न्यायाधीशांची नियुक्ती करण्याबाबत मुंबई उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायमूर्तींशी मुख्यमंत्र्यांची चर्चा झाली आहे. मुख्य न्यायाधीशांकडून न्यायमूर्तींच्या नावांचे पॅनेल देण्यात येणार आहे.चौकशी समितीसाठी त्यातील नाव निवडण्यात येणार आहे. हिंसाचाराची चौकशी करणाºया न्यायाधीशांनाच चौकशीत जे दोषी असतील त्यांना शिक्षा सुनावण्याचा अधिकार देण्यात येईल, असे आश्वासन मुख्यमंत्री फडणवीस यांनी दिल्याचे आंबेडकर यांनी सांगितले.सर्वोच्च न्यायालयाचे निवृत्त न्यायमूर्ती पी. बी. सावंत यांच्या अध्यक्षतेखाली एल्गार परिषद आयोजित करण्यात आली होती. त्यामुळे नक्षलवाद्यांनी हा कार्यक्रम आयोजित केला होता हा आरोप चुकीचा आहे. नक्षलवाद्यांनी हा कार्यक्रम आयोजित केल्याचा दावा राजकीय असल्याचे आंबेडकर म्हणाले.लोकांना मारण्यात आणि हिंसा पसरविण्यात जबाबदार असणाºयांवर कारवाई केली जाईल, असेही आश्वासन मुख्यमंत्र्यांनी दिले आहे. बंद पुकारून आम्ही दलित समाजाचा राग कैद करण्याचा प्रयत्न केला आहे. मात्र, या प्रकरणी आरोपींवर तत्काळ कारवाई करून सरकारने समाजाला विश्वास द्यावा. संभाजी भिडे आणि मिलिंद एकबोटे यांना अटक होते की नाही हे आमच्या दृष्टीने जास्त महत्त्वाचे असल्याचे ते या वेळी म्हणाले.छात्र भारतीच्या गुरुवारच्या कार्यक्रमाची परवानगी आदल्या दिवशीच नाकारण्यात आली होती. आम्ही कोणावर बंदी लादत नाही. आताच्या स्थितीत हा कार्यक्रम करणे योग्य नाही म्हणून कार्यक्रमाला परवानगी नाकारण्यात आल्याची माहिती मुख्यमंत्र्यांनी भेटीदरम्यान दिल्याचे आंबेडकर यांनी सांगितले. राज्यात सध्या जी परिस्थिती आहे ती लक्षात घेता हा कार्यक्रम पुढे ढकलायला हवा होता, असे व्यक्तिश: माझेही मत असल्याचे आंबेडकर यांनी सांगितले.रिपाइंचे राष्ट्रीय सरचिटणीस राजेंद्र गवई यांनीही शुक्रवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन कोम्बिंग आॅपरेशन थांबविण्याची मागणी केली. बंदनंतर दलित तरुणांची सुरू असलेली धरपकड थांबविण्याची तसेच कोरेगाव-भीमा प्रकरणातील दोषींवर कारवाई करण्याची मागणी मुख्यमंत्री फडणवीस यांनी मान्य केली. अमरावती येथे ३० हजारांहून अधिक लोकांनी आंदोलनात सहभाग नोंदविला होता. मुख्यमंत्र्यांसोबतची भेट समाधानकारक झाली असून त्यांनी आमच्या विविध मागण्या मान्य केल्याचे गवई यांनी सांगितले.

टॅग्स :प्रकाश आंबेडकरभीमा-कोरेगाव