Join us  

देवेंद्र फडणवीसांच्या 'त्या' मागणीला मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचा प्रतिसाद?

By ऑनलाइन लोकमत | Published: January 09, 2020 6:03 PM

विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी या प्रकारावर मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंवर आरोप केला होता.

मुंबई - जेएनयूमधील हिंसाचाराच्या घटनेचा निषेध करताना गेटवे ऑफ इंडिया येथे निदर्शने करण्यात आली. त्यावेळी महेक मिर्झा प्रभू या तरुणीच्या हातात ‘फ्री कश्मीर’ असा फलक होता. यामागे तिचा उद्देश काय होता याचा तपास करण्यात येत आहे अशी माहिती गृहमंत्री अनिल देशमुख यांनी पत्रकार परिषदेत दिली आहे. 

याबाबत बोलताना अनिल देशमुख म्हणाले की, काश्मीरमध्ये अजूनही मोबाईल आणि इंटरनेट सेवा सुरळीत नाही, नेत्यांना नजरकैदेत ठेवले आहे, या परिस्थितीपासून काश्मीर मुक्त करावा या भूमिकेतून आपण ‘फ्री काश्मीर’चा फलक लावला, असे त्या तरुणीचे म्हणणे आहे. याबाबत पोलीस चौकशी करीत असून संपूर्ण माहिती आल्यानंतर गुन्ह्याबाबत निर्णय घेऊ असा खुलासा त्यांनी केला. 

विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी या प्रकारावर मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंवर आरोप केला होता. काश्मीर मुक्त करण्याच्या घोषणा आझादी गॅंगकडून मुख्यमंत्री कार्यालयापासून अवघ्या 2 किमी अंतरावर दिल्या जातात. हा संपूर्ण प्रकार उद्धवजी आपण सहन करणार आहात काय? असा सवाल त्यांनी केला होता. 

तसेच कोरेगाव - भीमा प्रकरणी वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांची बैठक घेतली जाईल. अधिकऱ्यांकडून सविस्तर माहिती घेऊन त्यानंतरच मी याप्रकरणी भूमिका मांडेन, असे मंत्री देशमुख यांनी यावेळी पत्रकारांच्या एका प्रश्नाला उत्तर देताना सांगितले. ते म्हणाले की, कोरेगाव- भीमा संदर्भात काही माध्यमांनी माझ्या नावे चुकीची माहिती प्रसारीत केली.  कोरेगाव- भीमा संदर्भात सर्व अभ्यास करुन आणि अधिकाऱ्यांकडून माहिती घेतल्यानंतर बोलेन असं गृहमंत्र्यांनी स्पष्ट केलं. 

यावेळी एका मोठ्या गँगस्टरला पकडण्यासाठी मुंबई पोलीस दलाने केलेल्या कामगिरीबद्दल गृहमंत्र्यांनी पोलीसांचे अभिनंदन केले. गँगस्टर एजाज युसुफ लकडावाला याच्यावर खंडणीचे सुमारे २५ एफआयआर दाखल आहेत. त्याचबरोबर इतर ८० केसेस दाखल असून मोकाचे ४ खटले दाखल आहेत. छोटा राजन हा दाऊद इब्राहीमबरोबर काम करत असताना लकडावाला त्याच्यासोबत होता. छोटा राजन दाऊदपासून वेगळा झाल्यानंतर लकडावाला हा छोटा राजनसमवेत काम करु लागला. २००८ मध्ये छोटा राजनपासून विभक्त होऊन तो स्वतंत्रपणे ऑपरेट करु लागला. त्याच्यावर खंडणी, मोकासारखे विविध खटले दाखल आहेत. पोलीसांच्या प्रयत्नातून काल पाटणा येथून त्याला अटक करण्यात यश आले, अशी माहिती गृहमंत्री अनिल देशमुख यांनी दिली. 

टॅग्स :उद्धव ठाकरेदेवेंद्र फडणवीसजेएनयूगृह मंत्रालय