Join us  

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा शपथविधी सोहळा नियमानुसार; उच्च न्यायालयाला दिली माहिती

By ऑनलाइन लोकमत | Published: December 11, 2019 4:02 AM

जानेवारी २०१६ च्या अधिसूचनेनुसारच शिवाजी पार्कवर शपथविधी सोहळा पार पाडण्याची परवानगी दिल्याचे महापालिकेने प्रतिज्ञापत्रात म्हटले.

मुंबई : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा शिवाजी पार्कवरील शपथविधी सोहळा नियमाला अनुसरूनच होता. वर्षातील सहा दिवस राज्य सरकार शिवाजी पार्कवर कोणताही कार्यक्रम अयोजित करण्यास परवानगी देऊ शकते, अशी माहिती मुंबई महापालिकेने उच्च न्यायालयाला मंगळवारी दिली.

जानेवारी २०१६ च्या अधिसूचनेनुसारच शिवाजी पार्कवर शपथविधी सोहळा पार पाडण्याची परवानगी दिल्याचे महापालिकेने प्रतिज्ञापत्रात म्हटले. खेळाव्यतिरिक्त अन्य कार्यक्रमांसाठी शिवाजी पार्कचा वापर करण्यास महापालिका परवानगी देत असल्याने वीकॉम ट्रस्टने उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. या याचिकेला उत्तर देताना महापालिकेने न्यायालयाला सांगितले, २०३४ च्या विकास आराखड्यात शिवाजी पार्क ‘मनोरंजन मैदान’ म्हणून राखीव ठेवण्यात येणार आहे.

यूडीडीने २० जानेवारी २०१६ रोजी अधिसूचना काढून वर्षातील ४५ दिवस शिवाजी पार्कचा वापर खेळाव्यतिरिक्त अन्य कार्यक्रमांसाठी करण्याची मुभा दिली आहे. त्यापैकी सात दिवस डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाणदिनासाठी राखीव ठेवल्याची माहितीही पालिकेने न्या. एस. सी. धर्माधिकारी व न्या. रियाझ छागला यांच्या खंडपीठाला दिली. दरम्यान, राज्याच्या मुख्य सचिवांनी २७ नोव्हेंबर रोजी उद्धव ठाकरे यांचा मुख्यमंत्री शपथविधी सोहळा शिवाजी पार्कवर होणार असल्याची माहिती दिली. त्यानंतर राज्य सरकारने २०१६च्या अधिसूचनेनुसार शपथविधी सोहळा शिवाजी पार्कवर आयोजित करण्यास परवानगी दिली, असे महापालिकेने न्यायालयाला सांगितले.

टॅग्स :उद्धव ठाकरेउच्च न्यायालयशिवसेना