Join us

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आता वर्षा बंगल्यामध्ये; अक्षय्य तृतीयेचा मुहूर्त साधून केली विधीवत पूजा

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 1, 2025 05:32 IST

फडणवीस आणि त्यांच्या पत्नी अमृता यांनी बुधवारी सकाळी वर्षा बंगल्यावर जाऊन विधिवत पूजा केली. यावेळी त्यांच्या कार्यालयाचे अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.

मुंबई : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आजपासून वर्षा बंगल्यावर राहायला गेले. मुख्यमंत्री झाल्यानंतर तब्बल पाच महिन्यांनी ते वर्षा बंगल्यावर राहायला गेले आहेत.

फडणवीस आणि त्यांच्या पत्नी अमृता यांनी बुधवारी सकाळी वर्षा बंगल्यावर जाऊन विधिवत पूजा केली. यावेळी त्यांच्या कार्यालयाचे अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते. २०१९ मध्ये मुख्यमंत्रिपद गेल्यानंतर फडणवीस यांनी वर्षा बंगला सोडला होता. त्यानंतर ते विरोधी पक्षनेते झाले आणि सागर या बंगल्यावर राहायला गेले. ते उपमुख्यमंत्री झाल्यानंतर निवासस्थान आणि कार्यालय असे दोन्ही या बंगल्यात असल्याने जागा कमी पडू लागली. तेव्हा त्यांना बाजूचा मेघदूत हा बंगला देण्यात आला. सागरमध्ये निवासस्थान आणि मेघदूतमध्ये कार्यालय, अशी विभागणी झाली.

कन्या दिविजाला ९२.६०%

मुख्यमंत्र्यांची कन्या दिविजा हिने सीआयएससीई बोर्डाच्या बुधवारी जाहीर झालेल्या निकालात दहावीच्या परीक्षेत ९२.६० टक्के गुण मिळवत यश संपादन केले. दिविजाच्या यशाची बातमी अमृता फडणवीस यांनी ‘एक्स’वर दिली.

देसाईंना ‘जन्माचा’ बंगला

पर्यटनमंत्री शंभूराज देसाई हे सध्या मंत्रालयासमोरील पावनगड (बी ४) या बंगल्यात राहतात. मुख्यमंत्री मेघदूत बंगला सोडतील तेव्हा आपल्याला तो बंगला मिळावा, अशी मागणी देसाई यांनी आधीच केलेली होती.

देसाई यांचा जन्म या बंगल्यात झालेला आहे. त्यावेळी त्यांचे आजोबा लोकनेते बाळासाहेब देसाई हे कॅबिनेट मंत्री होते.

टॅग्स :देवेंद्र फडणवीस