चणे, फुटाणे, चिप्स हे पक्ष्यांचे अन्नच नाही; निसर्गाचे संतुलन बिघडवू नका, पक्षीमित्रांचे नागरिकांना आवाहन
By सचिन लुंगसे | Updated: December 29, 2024 14:31 IST2024-12-29T14:30:12+5:302024-12-29T14:31:00+5:30
रेस्क्यूइंक असोसिएशन फॉर वाइल्डलाइफ वेल्फेअरचे ॲड. पवन शर्मा यांनी सांगितले की, कबुतरांना आपण आयते खायला घालून त्यांची सवय बिघडवत आहोत...

चणे, फुटाणे, चिप्स हे पक्ष्यांचे अन्नच नाही; निसर्गाचे संतुलन बिघडवू नका, पक्षीमित्रांचे नागरिकांना आवाहन
मुंबई : पक्षी किंवा प्राण्यांचे खाद्य निसर्गात उपलब्ध असते. मात्र, गेल्या काही वर्षांपासून कबुतरासारख्या पक्ष्यांना चणे, फुटाणे तर, काही ठिकाणी चिप्सचा चुरा खाण्यासाठी टाकला जात आहे. हे खाद्य त्यांच्या शरीरासाठी घातक आहे. यामुळे निसर्गाचे चक्र किंवा निसर्गाचा समतोल बिघडण्याचा धोका वाढत आहे, अशी भीती पक्षीमित्रांनी व्यक्त केली.
रेस्क्यूइंक असोसिएशन फॉर वाइल्डलाइफ वेल्फेअरचे ॲड. पवन शर्मा यांनी सांगितले की, कबुतरांना आपण आयते खायला घालून त्यांची सवय बिघडवत आहोत. कारण निसर्गाने केलेल्या रचनेनुसार प्रत्येक पक्षी आणि प्राण्याला निसर्गात अन्न उपलब्ध आहे. परंतु, मुंबईत कबुतरांना मोठ्या प्रमाणावर चणे आणि फुटाणे खायला घातले जात आहेत. नवी मुंबई मार्केटसमोर कबुतरांना एवढे अन्नधान्य सहज उपलब्ध झाले आहे की, तेथील कबुतरे आळशी झाली आहेत. रस्ते अपघातात किंवा त्यांच्यावरून ट्रक गेला तरी त्यांना उडण्याची शुद्ध नसते, अशी अवस्था पाहायला मिळत आहे.
घाटकोपर, मुलुंड, भांडुप आदी परिसरांत कबुतरांना खाद्य म्हणून दाणे टाकले जातात. मात्र, माणसांच्या या सवयीमुळे कबुतरे त्यांच्या सवयी गमावून बसले आहेत. आता केवळ प्रजनन क्षमता शिल्लक असून, घरटे बांधण्याची कलाही कबुतरे विसरू लागली आहेत. घरटे बांधण्याऐवजी सहज जिथे राहता येईल, अशा ठिकाणी त्यांचे वास्तव्य वाढले आहे.
दाणे खायला घातल्याने त्यांची शारीरिक क्षमता कमी होत आहे. ज्याचा परिणाम त्यांच्या जीवनचक्रावर होत असून, या सवयींमुळे कबूतर खाण्याची किंवा एका ठिकाणी कबूतर जमा होण्याच्या ठिकाणांची संख्या वाढली आहे. याचा परिणाम म्हणून त्यांच्याद्वारे होणाऱ्या संसर्गातून आजारी माणसांना आणखी त्रास बळावत चालला आहे.
दरम्यान, गेल्या काही वर्षांमध्ये राज्यातील बहुतांश महापालिकांनी या संदर्भात फलक लावून जनजागृती हाती घेतली आहे. त्यामुळे निसर्गाचा समतोल बिघडू न देण्याचे काम प्रत्येकाचे आहे, असेही शर्मा यांनी सांगितले.
कबुतरांसारख्या सवयी आपण इतर पक्ष्यांनाही लावत आहोत. कावळ्यांनाही शेव खायला दिली जात आहे. हे पदार्थ खाण्यासाठी कावळ्यांचे थवेच्या थवे काही ठिकाणी एकत्र आल्याचे निदर्शनास येते. सिगलसारख्या समुद्री पक्ष्यांनाही आपण चिप्स देत असून, त्याचा त्याच्या आरोग्यावर विपरित परिणाम होत आहे. मुंबईच्या समुद्रकिनारी हे दृश्य सहज निदर्शनास येत असून, याबाबत पक्षीमित्रांनी जनजागृती करायला हवी.
- संदीप पटाडे, घाटकोपर
पचनसंस्थेवर वाईट परिणाम
कबुतरांना चणे, फुटाणे खायला घालणे त्यांच्यासाठी धोकादायक ठरू शकते. कारण अशा कृत्रिम आहारामुळे त्यांच्या पचनसंस्थेवर वाईट परिणाम होतो. नैसर्गिक आहाराऐवजी मिळालेला अन्नाचा अतिरिक्त साठा त्यांच्या प्रजनन क्षमतेत वाढ करतो. ज्यामुळे शहरी भागात कबुतरांची संख्या अनियंत्रित वाढते. यामुळे त्यांच्या विष्ठेमुळे सार्वजनिक ठिकाणी अस्वच्छता आणि आजारांचे प्रमाण वाढते. पर्यावरणाच्या दृष्टीने जैवविविधतेला धोका निर्माण होतो आणि अन्य पक्ष्यांसाठी अन्नसाखळी विस्कळीत होऊ शकते. म्हणून कबुतरांना नैसर्गिकरीत्या जगू देणेच योग्य आहे, तसेच रस्त्यावरून येणारी भरधाव वाहने कित्येक वेळा कबुतरांच्या जीवाला धोकादायक ठरतात. - डॉ. रसिका वैद्य