छोटा शकील, टायगर मेमन सीबीआय अधिकारी?

By Admin | Updated: February 8, 2015 00:47 IST2015-02-08T00:47:23+5:302015-02-08T00:47:23+5:30

टायगर मेमन आणि कुख्यात गँगस्टर छोटा शकील यांच्यासह अनेक कुख्यात गुन्हेगार हे सीआयडी, सीबीआय अधिकारी असल्याची ओळखपत्रे एका स्वयंसेवी संस्थेने दिली आहेत.

Chhota Shakeel, Tiger Memon CBI officer? | छोटा शकील, टायगर मेमन सीबीआय अधिकारी?

छोटा शकील, टायगर मेमन सीबीआय अधिकारी?

मुंबई : गेली अनेक वर्षे फरारी असलेला मुंबई बॉम्बस्फोटातील आरोपी टायगर मेमन आणि कुख्यात गँगस्टर छोटा शकील यांच्यासह अनेक कुख्यात गुन्हेगार हे सीआयडी, सीबीआय अधिकारी असल्याची ओळखपत्रे एका स्वयंसेवी संस्थेने दिली आहेत. विशेष म्हणजे या ओळखपत्रांवर राजचिन्हाचे शिक्केही आहेत.
आॅल इंडिया लेबर वेल्फेअर सेवा संघ या नावाने नोंदणी केलेल्या संस्थेने ही ओळखपत्रे जारी केली आहेत. याबाबत मालाड येथील राष्ट्रीय भ्रष्टाचार आणि अपराध निवारक परिषदेचे अध्यक्ष मोहन कृष्णन यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना निवेदन सादर केले असून, गृहमंत्री आणि पोलीस आयुक्तांकडे तक्रारही केली आहे.
आॅल इंडिया लेबर वेल्फेअर सेवा संघाचा अध्यक्ष जीवित राम हा आपल्या सभासदांना दिलेल्या ओळखपत्रावर रबर स्टॅम्पद्वारे भारत सरकारचे राजचिन्ह उमटवत असल्याचे मोहन कृष्णन यांना आढळले. या ओळखपत्रांवर मुख्य दक्षता अधिकारी, मुख्य चौकशी अधिकारी, मुख्य तपास अधिकारी, सीआयडी आॅफीसर, कृती समिती अध्यक्ष अशी पदे नमूद करण्यात आली आहेत.
ही गंभीर बाब निदर्शनास आल्यावर आपण या संस्थेचा पश्चिम बंगालचा अध्यक्ष मनीष चौधरी याच्याशी संपर्क साधला असता, पाच हजार रुपयांत असे ओळखपत्र मिळवून देत असल्याचे त्याने सांगितले. त्यानुसार मी माझे स्वत:चे मुख्य चौकशी अधिकारी असे ओळखपत्र बनवून घेतले. त्यानंतर इंटरनेटवरून फरारी गँगस्टर छोटा शकील, मुंबईच्या १९९३ सालच्या बॉम्बस्फोटातील आरोपी टायगर मेनन यांची छायाचित्रे पाठवून प्रत्येक कार्डासाठी पाच हजार रुपये दिले. त्यानंतर कोणतीही शहानिशा न करता सर्वांची ओळखपत्रे घरपोच करण्यात आली, असे मोहन कृष्णन यांनी निवेदनात नमूद केले आहे.

ओळखपत्रे देणारी ही संस्था दहशतवाद्यांनाही अशाप्रकारे बनावट सरकारी ओळखपत्रे देऊ शकते, हे लक्षात घेऊन देशभरात अनेक ठिकाणी पसरलेल्या या संस्थेवर कठोर कारवाई करण्यात यावी, अशी मागणीही मोहन कृष्णन यांनी केली आहे.

Web Title: Chhota Shakeel, Tiger Memon CBI officer?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.