मुंबई : छत्रपती शिवाजी महाराजांचे दुर्मीळ आदेश पत्र आता पुस्तक स्वरूपात उपलब्ध झाले आहेत. महाराष्ट्र पुराभिलेख संचालनालयाने निवडक आदेश पत्र पुस्तकरुपाने समोर आणले. हे आदेश पत्र आजच्या पिढीला समजावून घेता यावे; यासाठी संचालनालयाने हा ऐतिहासिक ठेवा प्रसिद्ध केला आहे. आदेश पत्रांत मुंबई कार्यालयातील ४ पत्र, पुण्यातील पुराभिलेखागारातील ७ आणि कोल्हापूर पुराभिलेखागारातील २४ शिवकालीन पत्र आहेत. यातील काही पत्र मोडी लिपीत, तर काही देवनागरी लिपीत रुपांतर केल्यामुळे शिवकालीन पत्र व्यवहार कशा प्रकारे होत होता, हे समजणे शक्य होणार आहे. १०६ पानांच्या ऐतिहासिक ग्रंथाचे संपादन पुराभिलेख संचालनालयाचे संचालक सुजितकुमार उगले यांनी केले आहे. तसेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी या उपक्रमाचे अभिनंदन केले आहे.
काही दुर्मीळ आदेश पत्र१८ डिसेंबर १६६० - पुणे, इंदापूर, चाकण, सुपे बारामती येथील हिंदू - मुसलमानांची इनामे अफजलखानाच्या स्वारीपूर्वी ज्याप्रमाणे होती; ती त्याच प्रमाणे चालविण्याबाबतचा आदेश. ३० ऑक्टोबर १६४६ - संभाजी भोसले देशमुख यांचे इनाम पूर्ववतपणे पुढे चालविण्याचा आदेश. इ. स. १६७१ - आग्र्याहून निघतेवेळी संभाजी राजेंना कृष्णाजी विश्वास यांच्या हवाली केले. तसेच राजगडावर सुखरूपपणे पोहोचविल्याबाबत ५०,००० रुपये कृष्णाजी विश्वास यांना देण्याबाबतचा आदेश.
सांस्कृतिक कार्यमंत्री आशिष शेलार, विभागाचे अपर मुख्य सचिव विकास खारगे यांनी मार्गदर्शन आणि सहकार्य केले. त्यामुळेच छत्रपतींची दुर्मीळ आदेश पत्र प्रसिद्ध होऊ शकली.सुजितकुमार उगले, संचालक, पुराभिलेख संचालनालय