Join us  

नवी मुंबई विमानतळाला शिवरायांचेच नाव; वाद होणे हे दुर्दैवी - राज ठाकरे

By ऑनलाइन लोकमत | Published: June 22, 2021 11:33 AM

नवी मुंबईतील विमानतळाला दि.बा. पाटील यांचे नाव देण्याची मागणी स्थानिकांकडून होत आहे, तर शिवसेनेने विमानतळाला बाळासाहेबांचे नाव देण्याची आग्रही भूमिका घेतली.

मुंबई : नवी मुंबई येथील आंतराष्ट्रीय विमानतळ हे मुंबईतील सध्याच्या विमानतळाचाच विस्तार आहे. देशांतर्गत वाहतुकीसाठी मुंबई आणि आंतरराष्ट्रीय विमानांसाठी नवी मुंबईचे विमानतळ वापरले जाईल. त्यामुळे नवी मुंबईतील विमानतळाचे नावही छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ असायला हवे, असे सांगत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी सोमवारी नामकरण वादात उडी घेतली.

नवी मुंबईतील विमानतळाला दि.बा. पाटील यांचे नाव देण्याची मागणी स्थानिकांकडून होत आहे, तर शिवसेनेने विमानतळाला बाळासाहेबांचे नाव देण्याची आग्रही भूमिका घेतली. यावरून निर्माण झालेल्या संघर्षात मनसेच्या पाठिंब्यासाठी नवी मुंबईचे भाजप आमदार प्रशांत ठाकूर आणि महेश बालदी यांनी सोमवारी राज ठाकरे यांची भेट घेतली. या भेटीनंतर त्यांनी ही भूमिका मांडली. नवी मुंबई किंवा पनवेलमध्ये विमानतळ उभारले जात असले तरी ते मुंबईतील सध्याच्या विमानतळाचाच विस्तार आहे. दोन्ही विमानतळांचा आंतराष्ट्रीय कोडनेम हा ‘बीओएम’ असाच असणार आहे. त्यामुळे त्याला छत्रपती शिवाजी महाराजांचेच नाव देणे संयुक्तिक राहील, असे राज ठाकरे म्हणाले.

बाळासाहेब ठाकरे आदरणीय आहेतच. दि. बा. पाटील यांच्या कार्याबाबतही दुमत असण्याचे कारण नाही. महाराष्ट्र ही शिवरायांची भूमी आहे, मुंबई ही राजधानी आहे. परदेशातून येणारा माणूस जेव्हा इथल्या आंतरराष्ट्रीय विमानतळावर उतरतो तेव्हा तो शिवरायांच्या भूमीत उतरत असतो. आज बाळासाहेब असते तर त्यांनीही विमानतळाला महाराजांचेच नाव दिले असते, असे सांगून राज ठाकरे म्हणाले, विमानतळाला शिवरायांचे नाव दिले जाणार असेल तर त्याला कोणाचाही विरोध नसेल. स्थानिकही त्याला विरोध करणार नाहीत, असे प्रशांत ठाकूर यांनी मला सांगितले.

‘वाद होणे हे दुर्दैवी’

आंतरराष्ट्रीय विमानतळाचा विषय केंद्राच्या अखत्यारीत आहे. सिडकोने मंजूर केले नि राज्याने प्रस्ताव दिला, असे होत नाही. नामांतरावरून वाद व्हावा, हेच दुर्दैव आहे. खरे तर विमानतळ लवकर होण्यासाठी राज्य सरकारने रेटा लावला पाहिजे. त्यातल्या अडचणी सोडवण्यास प्राधान्य दिले पाहिजे, याकडे त्यांनी लक्ष वेधले.

टॅग्स :राज ठाकरेसंभाजी राजे छत्रपतीमहाराष्ट्र सरकार