चेंबूरमधून ठगाला बेड्या

By Admin | Updated: February 16, 2015 04:59 IST2015-02-16T04:59:39+5:302015-02-16T04:59:39+5:30

मोबाइल दुकानात भागीदारी देतो सांगून, तसेच इतर प्रकारांमधून अनेकांना साडेचार कोटींचा गंडा घालणाऱ्याला पोलिसांनी अटक केली.

Chestnut cheats | चेंबूरमधून ठगाला बेड्या

चेंबूरमधून ठगाला बेड्या

नवी मुंबई : मोबाइल दुकानात भागीदारी देतो सांगून, तसेच इतर प्रकारांमधून अनेकांना साडेचार कोटींचा गंडा घालणाऱ्याला पोलिसांनी अटक केली. नवी मुंबईसह मुंबईत त्याच्यावर फसवणुकीचे गुन्हे दाखल आहेत. सतत ठिकाणे बदलत राहणाऱ्या या ठगाला पोलिसांनी चेंबूर येथून अटक केली आहे.
वाशी येथे राहणारे सतीश सावंत (५४) यांची सन २०१० ते १२ दरम्यान ४ कोटी ४५ लाख रुपयांची फसवणूक झाली. घाटकोपर येथे राहणाऱ्या दीपक कराणी (३०) याने फोनवर्ल्ड नावाच्या कंपनीत भागीदारी देतो असे सांगून सावंत यांच्याकडून ही रक्कम घेतली. मात्र प्रत्यक्षात भागीदार न बनवता तसेच रकमेची परतफेड न करता दीपक कराणी याने सावंत यांची फसवणूक केली. परंतु सावंत यांनी सदर रक्कम परत मागितली असता त्यांना धमकावले होते. याप्रकरणी वाशी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला. तपासादरम्यान कराणी याच्यावर गोरेगाव पोलीस ठाण्यात देखील गुन्हा दाखल असल्याचे समोर आले. स्वत:ला राखी सावंत ब्युटी लाँज लिमिटेड कंपनीचा डायरेक्टर सांगून त्याने लक्ष्मीनारायण यादव यांची २८ लाखांची फसवणूक केली. मोबाइल खरेदी - विक्रीच्या व्यवसायाच्या बहाण्याने कराणी व त्याचे सहकारी शिबू माधवन, अफजल कापडीया यांनी ही फसवणूक केली.
अखेर सखोल तपासाअंती गुन्हे शाखा पोलिसांनी त्याला चेंबूर येथून अटक केली. गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुनील बाजारे, सहाय्यक निरीक्षक सुभाष शिंदे यांच्या पथकाने ही कारवाई केली. मुंबई पोलिसांसह नवी मुंबई पोलीस अनेक महिन्यांपासून कराणीच्या शोधात होते. परंतु सतत राहण्याची ठिकाणे बदलत असल्याने तो अद्यापपर्यंत सापडला नव्हता. नागरिकांसोबत ओळख वाढवून तो फसवणूक करायचा असे गुन्हे शाखा उपआयुक्त सुरेश मेंगडे यांनी सांगितले. कराणी याने इतरही अनेक नागरिकांची फसवणूक केल्याची शक्यताही मेंगडे यांनी व्यक्त केली आहे.(प्रतिनिधी)

Web Title: Chestnut cheats

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.