चेन्नईचे उणे-अधिक माहीत आहे : रोहित
By Admin | Updated: May 10, 2014 00:34 IST2014-05-10T00:34:09+5:302014-05-10T00:34:09+5:30
चेन्नई सुपर किंग्जविरुद्ध होणारा सामना मुंबई इंडियन्ससाठी अतिशय महत्त्चाचा असून, या सामन्यात चांगला खेळ पाहायला मिळेल, असे मुंबईचा कर्णधार रोहित शर्मा याने म्हटले आहे.

चेन्नईचे उणे-अधिक माहीत आहे : रोहित
विनय नायडू
मुंबई - चेन्नई सुपर किंग्जविरुद्ध होणारा सामना मुंबई इंडियन्ससाठी अतिशय महत्त्चाचा असून, या सामन्यात चांगला खेळ पाहायला मिळेल, असे मुंबईचा कर्णधार रोहित शर्मा याने म्हटले आहे. दोन्ही संघांदरम्यान वानखेडेवर झालेला सामना आम्ही जिंकला होता. त्याची पुनरावृत्ती करण्याचा आमचा प्रयत्न आहे. पूर्वीचा संघ आणि आत्ताचा संघ यांत फरक असला, तरी आम्हाला यश येईल, असे रोहित म्हणला. यंदाच्या आयपीएलमध्ये यूएईमध्ये झालेला सामना चेन्नईने जिंकला होता; पण रोहित या घटनेला मागे टाकून उद्याच्या सामन्याचा विचार करतोय. तो म्हणाला, ‘‘आम्ही त्यांच्याविरुद्ध अनेक सामने खेळलो असल्यामुळे त्यांच्या जमेच्या बाजू आणि उणेपणा दोन्ही जाणून आहोत. त्यांच्याकडे अनेक खेळाडू मॅचविनर आहेत. आम्ही त्यावर चर्चा करीत आहोत. मैदानावर कोणत्या गोष्टी त्यांना आवडत नाहीत, हेही आम्हाला माहीत आहे. त्यानुसार आमची रणनीती असेल. एकंदरीतच उद्या चांगला सामना पहायला मिळेल.’’ पोलार्ड व स्टार्क यांच्यातील त्या घटनेबद्दल रोहित म्हणाला, ‘‘जे घडले ते वाईटच होते. आम्ही याविषयी पोलार्डशी चर्चा केली आहे. हा खेळ कलंकित व्हावा, असे कोणालाच वाटत नाही. पोलार्ड आक्रमक खेळाडू आहे; पण तो कोणतीही गोष्ट मुद्दाम करीत नाही. संघाचा कर्णधार म्हणून त्याने मैदानावर कसे वर्तन करावे, हे त्याला सांगणे माझे काम आहे. आम्ही त्याच्याशी चर्चा केली, त्यानेही सकारात्मक प्रतिसाद दिला आहे.’’
गेल्या सामन्यातील ग्लेन मॅक्सवेलचा घणाघात विसरून आम्हाला पुन्हा नव्याने सुरवात करायची आहे. मुंबई इंडियन्स संघ घरच्या मैदानावर गेल्या काही सामन्यांत अजिंक्य असला, तरी त्यांना हरवण्यात यश येईल, असे मत चेन्नई सुपर किंग्जचा प्रशिक्षक स्टीफन फ्लेमिंग याने व्यक्त केले आहे.
मॅक्सवेलने आमच्या संघाला दबावात ठेवले, अशी कबुली देऊन फ्लेमिंग म्हणाला, ‘‘मॅक्सवेलच्या तडाख्यानंतरही आमच्या संघाने जवळ जवळ १९0 धावा केल्या होत्या. आमची फलंदाजीची फळी उत्तम आहे, हे त्याचे उदाहरण आहे; पण मॅक्सवेलने दोन्ही संघांत फरक निर्माण केला. फ्लेमिंग म्हणाला, ‘‘साखळी सामन्यानंतर पदकतालिकेत पहिल्या दोन संघांत स्थान मिळवायचे आमचे लक्ष्य आहे.
त्यामुळे प्लेआॅफची लढत आम्हाला चेन्नईत खेळायला मिळेल. सलग सहा सामने जिंकले, तर आमचे स्थान बळकट होईल; पण त्यासाठी पुढील तीन सामने महत्त्वाचे आहेत. उद्याचा सामना जिंकून राजस्थान आणि हैदराबाद या संघांवर दबाव निर्माण करायचा आहे.