चेंबूरचे रहिवासी हैराण
By Admin | Updated: December 30, 2014 00:36 IST2014-12-30T00:36:56+5:302014-12-30T00:36:56+5:30
दिवसेंदिवस वाढणारी वाहतूककोंडी कमी व्हावी, यासाठी चेंबूर परिसरात फेरीवाल्यांना बसण्यास पोलिसांनी विरोध केला होता.

चेंबूरचे रहिवासी हैराण
चेंबूर : दिवसेंदिवस वाढणारी वाहतूककोंडी कमी व्हावी, यासाठी चेंबूर परिसरात फेरीवाल्यांना बसण्यास पोलिसांनी विरोध केला होता. त्यामुळे गेल्या दोन महिन्यांत या ठिकाणी वाहतूककोंडी कमी झाल्याचे चित्र होते. मात्र सध्या या परिसरातील काही इमारतींच्या बांधकामासाठी रस्त्यालगत सिमेंट मिक्सरची वाहने उभी राहत असल्याने पुन्हा एकदा या परिसरात वाहतूककोंडी कमालीची वाढली आहे.
हार्बर रेल्वे मार्गावरील महत्त्वाच्या रेल्वे स्थानकांमध्ये चेंबूर रेल्वे स्थानकाचा समावेश आहे. या स्थानकातून दररोज लाखो प्रवासी प्रवास करत असल्याने स्थानक परिसरात नेहमी मोठी गर्दी पाहायला मिळते. मात्र गेल्या काही वर्षांत स्थानक परिसरात बोटावर मोजण्याइतकेच फेरीवाले या ठिकाणी होते. त्यानंतर मात्र या ठिकाणी सातशे ते आठशे फेरीवाल्यांनी संपूर्ण फुटपाथ अडवून रस्तादेखील अडवला होता. त्यामुळे या ठिकाणी मोठ्या प्रमाणात वाहतूककोंडीची समस्या निर्माण झाली होती.
या वाहतूककोंडीवर तोडगा म्हणून चेंबूर पोलिसांनी या फेरीवाल्यांना अनेकदा समज देऊन बाकड्यांची साइज कमी करण्याची विनंती केली. मात्र फेरीवाल्यांकडून नेहमीच पोलिसांच्या सूचनांकडे कानाडोळा होत असल्याने दोन महिन्यांपूर्वी पोलिसांनी या परिसरातील सर्व फेरीवाल्यांना हटवले होते. त्यामुळे सर्वच नागरिकांकडून पोलिसांचे अभिनंदन केले जात होते. रस्त्यावरील वाहतूककोंडी सुटल्याने एकीकडे आनंद व्यक्त होत असताना रेल्वे स्थानक परिसरातच काही विकासकांनी इमारतींची कामे सुरू केली आहेत. त्यामुळे या इमारतीच्या बांधकामासाठी लागणारे सिमेंट मिक्सर रस्त्यालगतच उभे राहत असल्याने गेल्या महिनाभरापासून पुन्हा या मार्गावर वाहतूककोंडीची समस्या निर्माण झाली आहे. त्यामुळे पोलिसांनी अशा अनधिकृतरीत्या रस्त्यावर वाहने उभी करणाऱ्यांवरदेखील कडक कारवाई करावी, अशी मागणी पादचाऱ्यांसह स्थानिक दुकानदारांकडूनदेखील करण्यात येत आहे. (प्रतिनिधी)