चेंबूरमध्ये माकडांच्या टोळीने रहिवासी हैराण!
By Admin | Updated: September 8, 2015 05:10 IST2015-09-08T05:10:53+5:302015-09-08T05:10:53+5:30
गेल्या काही वर्षांत शहराबाहेर असलेल्या जंगलांमध्ये मोठ्या प्रमाणात झाडांची कत्तल करण्यात आली आहे. त्यामुळे झाडांवर राहणारे प्राणी आता शहरात फिरताना दिसत आहेत.

चेंबूरमध्ये माकडांच्या टोळीने रहिवासी हैराण!
मुंबई : गेल्या काही वर्षांत शहराबाहेर असलेल्या जंगलांमध्ये मोठ्या प्रमाणात झाडांची कत्तल करण्यात आली आहे. त्यामुळे झाडांवर राहणारे प्राणी आता शहरात फिरताना दिसत आहेत. अशाच प्रकारे गेल्या महिनाभरापासून माकडांची एक टोळी चेंबूरमध्ये फिरत आहे. घरांच्या छपरांवर चढून उड्या मारणे, खिडकीतून घरात येणे असे प्रकार सध्या चेंबूरमध्ये घडत असल्याने रहिवासी हैराण झाले आहेत.
चेंबूरच्या घाटला गाव परिसरात गेल्या महिनाभरापासून अशाच प्रकारे तीन ते चार माकडांची एक टोळी फिरत आहे. ही टोळी अन्नासाठी रहिवाशांच्या घरावर तर कधी खिडकी आणि दरवाजातून घरात घुसते. ते घरातील खाद्यपदार्थावर ताव मारतात. त्यांच्या या मर्कटलीलांमुळे स्थानिक धास्तावले आहेत. घरात लहान मुले आणि महिला एकट्या असल्याने माकडांकडून त्यांच्यावर हल्ला होण्याची भीती आहे. वन अधिकाऱ्यांनी या माकडांना पकडावे यासाठी स्थानिकांनी तक्रारीदेखील केल्या आहेत. मात्र अद्यापही माकडांना पकडण्यात आलेले नाही.