Join us  

स्टार शेफ विकास खन्नाने तब्बल 26 वर्षांनी घेतली दंगलीत जीव वाचवणाऱ्या मुस्लीम परिवाराची भेट!

By ऑनलाइन लोकमत | Published: June 15, 2018 12:33 PM

नुकताच त्याने त्याच्या आयुष्यातील एका फार महत्वाच्या गोष्टीचा खुलासा केला. ती म्हणजे विकास हा रमजानच्या महिन्यात एक दिवस उपवास करतो. त्याला कारणही तितकच भावनिक आहे. 

मुंबई : स्टार शेफ विकास खन्ना याच्या रेसिपीज मोठ्या प्रमाणात फॉलो केल्या जातात. विकास खन्ना हा सर्वात हॉट शेफ म्हणूनही जगभरात प्रसिद्ध आहे. नुकताच त्याने त्याच्या आयुष्यातील एका फार महत्वाच्या गोष्टीचा खुलासा केला. ती म्हणजे विकास हा रमजानच्या महिन्यात एक दिवस उपवास करतो. त्याला कारणही तितकच भावनिक आहे. 

मुंबईत ज्यावेळी दंगल घडली होती त्यावेळी विकास हा सी रॉक शेरटॉन हॉटेलमधून आपली शिफ्ट संपवून घरी जात होता. इतक्यात मुंबईत दंगली घडत असल्याची बातमी त्याला मिळाली. त्यामुळे हॉटेलच्या स्टाफला बाहेर जाण्यास मनाई करण्यात आली. सोबतच हॉटेलमध्ये ग्राहकही होते. त्यामुळेही सर्वांना हॉटेलमध्येच थांबावं लागलं. 

विकासने सांगितले की, 'माझं काम त्यावेळी अंडे शिजवणे आणि इतर गोष्टी शिजवणे होते. अनुपम खेर यांनी घेतलेल्या एका मुलाखतीत त्याने हे सांगितलं. तो म्हणाला की, काही वेळाने मला असे समजले की, अनेक लोकांना घाटकोपरमध्ये जीवाने मारण्यात आले आहे. त्यावेळी माझा भाऊ घाटकोपरमध्ये राहत होता'. 

ही माहिती मिळताच विकासने घाटकोपरला जाण्याचा निर्णय घेतला. त्याला त्याच्या भावाची काळजी वाटू लागली होती. त्यामुळे भावासाठी तो कोणतीही रिस्क घेण्यासाठी तयार झाला. तो म्हणाला की, 'मी घाटकोपरच्या दिशेने पायी चालायला लागलो. सगळीकडे मोठ्या प्रमाणात गर्दी होती. दंगली सुरु होत्या. अशात एका मुस्लीम परिवाराने मला तू इथे काय करतोय? असे विचारले. मी त्यांना सांगितले की, माझा भाऊ घाटकोपरला आहे आणि मला तिथे कसं जायचं हे कळत नाहीये. त्यांनी मला त्यांच्या घरात येण्याची विनंती केली. कारण बाहेर दंगल सुरु होती'. 

(Image Credit: Hindustantimes.com)

नंतर विकास त्या मुस्लीम परिवारासोबत दीड दिवस त्यांच्याच घरात राहिला. त्या लोकांनीच घाटकोपरमधील विकासचा भाऊ सुखरुप आहे यांची माहिती मिळवली. 

त्यानंतर विकासचा त्या परिवाराशी संपर्क तुटला. पण त्या दिवसापासून विकासने दरवर्षी रमजानमध्ये एक दिवस उपवास करण्यास सुरुवात केली. त्या मुस्लीम परिवाराने त्याचा जीव वाचवला होता. त्यामुळे त्यांचा सन्मान करण्यासाठी त्याने हे सुरु केले. 

 

अचानक 11 जून रोजी विकासने ट्विटरवरुन एक आनंदाची बातमी दिली. तब्बल 26 वर्षांनंतर विकास त्या मुस्लीम परिवाराला भेटला होता. याची माहिती त्याने ट्विट करुन दिली. 

टॅग्स :मुंबईरमजान ईदअनुपम खेरभीमा-कोरेगाव