मुंबई : ढोल ताशांचा गजर, शिंग-तुतारीच्या ललकारी, अशा पारंपरिक थाटात बुधवारी राज्यात शिवजन्माचे स्वागत करत हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्मोत्सव अपूर्व उत्साहात साजरा झाला. राज्यात ठिकाठिकाणी ढोल ताशाच्या गजरात शाही मिरवणुका काढण्यात आल्या. त्यामध्ये ऐतिहासिक वेशभूषेतील मावळे, घोडेस्वार सहभागी झाले होते. तलवारबाजी, दांडपट्टा, मल्लखांब अशा मर्दाने खेळांचेही प्रदर्शन घडवण्यात आले. महिलांनीही ठिकठिकाणी चांदीचा पाळणा बांधून बाळ शिवाजीच्या जन्मोत्सवाचे गुणगाण गायिले. कोल्हापूर व सातारा या संस्थानिकांच्या नगरीत शाही पध्दतीने शिवजन्माचे स्वागत करण्यात आले.
राज्यभर शिवरायांच्या पुतळ्यांभोवती आकर्षक विद्युत रोषणाई व सजावट करुन उत्साहात भर टाकली होती. घरासमोर घातलेल्या सडा -रांगोळ्यांनी अवघा महाराष्टÑ शिवजन्माच्या उत्साहात न्हाऊन निघाला होता. शिवजन्माचे पाळणे आणि शिवकिर्तीचे पोवाडे यांने वातावरण भारावून गेले होते. आज अनेक बालकांना त्यांच्या मातांनी शिवबाची वेशभूषा केली होती. छत्रपतींच्या वेशभूषेतील बालशिवाजी लक्ष वेधून घेत होते.मुख्यमंत्री उध्दव ठाकरे व उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पुणे जिल्ह्यातील शिवनेरी गडावर जाऊन लाखो मावळ्यांसह शिवजन्मोत्सवात सहभाग घेतला. राज्यातील विविध गडांवर तरुणाईने आवर्जुन हजेरी लावली. विविध गडावर भ्रमंतीसाठी आलेल्या युवकांचे थवे दिसत होते.अमेरिकेतील दूतावासात शिवरायांचा जयघोषमहाराष्ट्रातील तरुणाईचा उत्स्फूर्त सहभाग
गंगाराम पाटील ।सांगली : अमेरिकेतील न्यूयॉर्क शहरातील भारतीय वाणिज्य दूतावास ‘जय भवानी जय शिवाजी’च्या घोषणांनी दुमदुमून गेला. निमित्त होते शिवजयंतीचे. कोकरूड (ता. शिराळा) येथील डॉ. युनूस अत्तार यांच्यासह महाराष्ट्रातील तरुणांनी मोठ्या उत्साहात शिवजयंती साजरी करत शिवरायांचा जय जयकार केला.