Join us

संभाव्य दुबार मतदारांची तपासणी करा; राज्य निवडणूक आयोगाचे मतदार याद्यांबाबत आदेश

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 30, 2025 06:44 IST

महाविकास आघाडी तसेच महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने मतदार याद्यातील घोळावरून आवाज उठवला आहे.

मुंबई : आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर विरोधी पक्षाने मतदार याद्यांमधील घोळ, चुका समोर आणल्यानंतर राज्य निवडणूक आयोगाने संभाव्य दुबार मतदारांची तपासणी करण्याचे आदेश दिले आहेत. अशा दुबार नावे असलेल्या मतदारांना शोधून त्यांच्याकडून कोणत्या मतदान केंद्रावर मतदान करणार याबाबत विहित नमुन्यात अर्ज भरून घेतला जाणार आहे.

महाविकास आघाडी तसेच महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने मतदार याद्यातील घोळावरून आवाज उठवला आहे. मतदार यादीत दुरुस्ती केल्याशिवाय निवडणुका घेऊ नका, असा इशारा विरोधी पक्षाने दिला आहे. यासंदर्भात १ नोव्हेंबर रोजी निवडणूक आयोगावर मोर्चा काढण्याचे विरोधी पक्षाने जाहीर केले आहे. या पार्श्वभूमीवर निवडणूक आयोगाने संभाव्य दुबार नावाबाबत उपाययोजना करण्याचे आदेश दिले आहेत.  स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी भारत निवडणूक आयोगाने तयार केलेली विधानसभा मतदारसंघाची मतदार यादी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या सर्व निवडणुकांसाठी जशीच्या तशी वापरली जाते. तिचे केवळ महानगरपालिका, नगरपरिषदा, नगरपंचायती आणि  ग्रामंपचायतींच्या निवडणुकासाठी प्रभागनिहाय; तसेच जिल्हा परिषद निवडणूक विभाग आणि पंचायत समिती निर्वाचक गणनिहाय विभाजन केले जाते. या मतदार याद्यांचे विभाजन करताना विधानसभा मतदारसंघाच्या मूळ यादीप्रमाणेच मतदार याद्यांमध्ये मतदारांची नावे आणि  पत्ते कायम ठेवले जातात.

हमीपत्र लिहून घेणार

संभाव्य दुबार नाव असलेल्या मतदाराकडून प्रतिसाद न मिळाल्यास असा मतदार मतदान केंद्रावर मतदानासाठी आल्यास त्या मतदाराकडून त्याचे नाव असलेल्या इतर कोणत्याही मतदान केंद्रावर मतदान केले नसल्याबाबत आणि करणार नसल्याबाबत विहित नमुन्यातील हमीपत्र लिहून घेण्यात येईल. अशा मतदाराची काटेकोरपणे ओळख पटल्यानंतरच त्याला मतदान करण्याची मुभा देण्यात येईल, असे  आयोगाने म्हटले आहे.स्थानिक स्वराज्य संस्थांच्या प्रारूप अथवा अंतिम मतदार यादीतील संभाव्य दुबार मतदाराच्या नावासमोर (**) असे चिन्ह नमूद करण्यात येते. ही संभाव्य दुबार मतदारांबाबत स्थानिकरीत्या तपासणी करून ती खरोखरच एकाच व्यक्तीची आहे किंवा वेगळ्या व्यक्तींची आहे, याबाबत खात्री केली जाईल. मतदाराचे नाव, लिंग, पत्ता आणि  छायाचित्राची  प्राथमिक तपासणीनंतर त्यात साम्य आढळून आल्यास त्या मतदाराकडून तो नेमका कोणत्या प्रभागातील, जिल्हा परिषद निवडणूक विभागातील/ पंचायत समितीच्या गणातील मतदान केंद्रावर मतदान करणार आहे, याबाबत विहित नमुन्यात अर्ज घेतला जाईल. अशा मतदारास उर्वरित कोणत्याही मतदान केंद्रावर मतदान करता येणार नाही. 

English
हिंदी सारांश
Web Title : Check potential duplicate voters: State Election Commission orders on voter lists.

Web Summary : Following opposition concerns, the State Election Commission orders checks for duplicate voters in anticipation of local elections. Voters will declare their designated polling station. Failing response, voters sign a declaration at polling places to prevent multiple voting. Duplicate names on lists will be marked.
टॅग्स :भारतीय निवडणूक आयोगमतदान