आयुक्तांचीच तपासणी करा
By Admin | Updated: March 26, 2015 01:50 IST2015-03-26T01:50:32+5:302015-03-26T01:50:32+5:30
आरे कॉलनीत दुसरे धारावी उभे राहील, या वक्तव्यामुळे वादाच्या भोवऱ्यात सापडलेले आयुक्त सीताराम कुंटे हे आणखी एका वादग्रस्त विधानामुळे गोत्यात आले आहेत़

आयुक्तांचीच तपासणी करा
मुंबई : आरे कॉलनीत दुसरे धारावी उभे राहील, या वक्तव्यामुळे वादाच्या भोवऱ्यात सापडलेले आयुक्त सीताराम कुंटे हे आणखी एका वादग्रस्त विधानामुळे गोत्यात आले आहेत़ दत्तक वस्ती योजनेतील संस्थांकडून नगरसेवक पैसे खातात, या त्यांच्या विधानामुळे खवळलेल्या सर्वपक्षीय स्थायी समिती सदस्यांनी आज चक्क आयुक्तांची केईएम रुग्णालयातील मानसोपचारतज्ज्ञांकडून तपासणी करून घेण्याची मागणी केली़ त्यामुळे लोकप्रतिनिधी व प्रशासन आमनेसामने आले आहेत़
मनसेचे गटनेते संदीप देशपांडे यांनी हरकतीच्या मुद्द्याद्वारे आयुक्तांवर हल्ला चढविला़ भायखळा येथील डॉ़ भाऊ दाजी लाड वस्तुसंग्रहालयात फॅशन शो आयोजित करण्यासाठी तेथील विश्वस्तांना पालिकेच्या परवानगीची आवश्यकता नसल्याचे आयुक्त म्हणत असल्याचे देशपांडे यांनी निदर्शनास आणले़ हे वस्तुसंग्रहालय पालिकेची मालमत्ता असून, खाजगी संस्थेला देखभालीसाठी दिले आहे़ तर महापौर विश्वस्त मंडळाच्या अध्यक्षा आहेत़
या विधानाबरोबरच आयुक्तांनी दत्तक वस्तीच्या संस्थांकडून नगरसेवक पैसे खात असल्याचा आरोप केला असल्याचे सदस्यांच्या निदर्शनास आणले़ यामुळे संतप्त सर्वपक्षीय सदस्यांनी आयुक्तांवर हल्लाबोल करीत मानसोपचारतज्ज्ञांकडून त्यांच्या तपासणीची मागणी केली़ एकापाठोपाठ एक वादग्रस्त विधाने करणाऱ्या आयुक्तांची चौकशी झालीच पाहिजे, अशी जोरदार मागणी करीत स्थायी समितीची बैठक तहकूब करण्यात आली़ (प्रतिनिधी)
च्भाऊ दाजी लाड वस्तुसंग्रहालयाच्या देखभालीसाठी बजाज फाउंडेशन, इनटॅक्ट आणि पालिका यांच्यामध्ये करार झाला आहे़ मात्र ही संस्था पालिकेला ताळेबंद कधीच सादर करीत नाही़ त्यांच्या नफ्यातून वाटाही पालिकेला मिळत नाही़ केवळ राजकीय कनेक्शनमुळे या संस्थेचे लाड पुरवायचे का, असा सवाल मनसेचे संदीप देशपांडे यांनी केला़
नगरसेवक भ्रष्टाचारी तर आयुक्त कोण ?
दत्तक वस्ती संस्थांकडून नगरसेवक पैसे खातात़ त्यामुळे मला या विषयावर चर्चा करायची नाही, असे उत्तर त्यांच्या कार्यालयात जाब विचारण्यासाठी गेलेल्या स्थापत्य समितीच्या (उपनगरे) सदस्यांना आयुक्त कुंटे यांनी सोमवारी दिले होते़ त्यांच्या या विधानाचा समाचार घेत आयुक्तांच्या अधिपत्याखाली असलेले बांधकाम प्रस्ताव विभाग सर्वात भ्रष्ट आहे़ मग नगरसेवक भ्रष्ट म्हणावे की आयुक्त, असा टोला भाजपाचे दिलीप पटेल यांनी लगावला़