मुंबई : ग्राहकांनी वीज बिल भरण्यासाठी दिलेल्या चेकपैकी दरमहा सरासरी १० हजार ५०० चेक बाउन्स होत आहेत. जानेवारी ते मार्च या तीन महिन्यांतील ही आकडेवारी आहे. त्यामुळे या ग्राहकांना प्रत्येक वीज बिलासाठीचा विलंब आकार अधिक जीएसटी करासह ८८५ रुपयांचा दंड पुढील महिन्याच्या वीज बिलामध्ये इतर आकार म्हणून आकारण्यात येत आहे.४ लाख ५१ हजार वीजग्राहक दरमहा वीज बिलांचा भरणा चेकद्वारे करतात. बाउन्स झालेल्या एकाच चेकद्वारे अनेक वीज बिलांचा भरणा केलेला असल्यास प्रत्येक वीज बिलासाठी दंड आकारण्यात येतो. यासोबतच चेकद्वारे वीज बिल भरण्याची सोय सहा महिन्यांसाठी निलंबित करण्यात येते. चेकवर चुकीची तारीख, खाडाखोड, चुकीची स्वाक्षरी, चुकीचे नाव, खात्यात रक्कम नसणे या कारणाने चेक बाउन्स होत आहेत. चेक दिल्यानंतर तो क्लिअर होण्यासाठी पाच दिवसांचा कालावधी लागतो. चेक दिल्यानंतर वीज बिल भरल्याची पावती त्याच दिवशी मिळत असली तरी चेकची रक्कम जमा झाल्याच्या तारखेलाच वीज बिल भरणा ग्राह्य धरला जातो. त्यामुळे मुदतीच्या एक-दोन दिवस आधी दिलेल्या चेकची रक्कम मुदतीनंतर जमा झाल्याने पुढील वीज बिलामध्ये थकबाकी दिसून येते.
महिन्याला १० हजारांवर वीज ग्राहकांचे चेक बाउन्स, तीन महिन्यांतील सरासरी आकडेवारी
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 6, 2021 12:23 IST