रो-हाऊस विक्री व्यवहारात फसवणूक
By Admin | Updated: August 11, 2014 00:43 IST2014-08-11T00:43:10+5:302014-08-11T00:43:10+5:30
ठरलेल्या व्यवहारानुसार रो-हाऊसची काही रक्कम स्विकारल्यानंतरही सदनिका विक्रीचा करारनामा न करता ग्राहकांची फसवणूक केल्याचा प्रकार घडला होता.

रो-हाऊस विक्री व्यवहारात फसवणूक
ठाणे : ठरलेल्या व्यवहारानुसार रो-हाऊसची काही रक्कम स्विकारल्यानंतरही सदनिका विक्रीचा करारनामा न करता ग्राहकांची फसवणूक केल्याचा प्रकार घडला होता. याप्रकरणी बगारिआ बिल्डर्स अॅण्ड डेव्हलर्पस्ला ठाणे ग्राहक तक्रार निवारण मंचाने पाच लाखांचा दंड ठोठावला आहे.
बदलापूर येथील शेरपाल सिंग यांनी बगारिआ बिल्डर्सच्या अंबरनाथ येथे विकसित केलेल्या रो-हाऊस प्रोजेक्टमधील एक रो-हाऊस ११ लाखांना घेण्याचे मान्य केले होते. त्यानुसार २९ मार्च २००७ रोजी शेरपाल यांनी १ लाख आणि त्यानंतर मे २००७ मध्ये ५० हजार रक्कम दिली. परंतु बिल्डर्स्कडून त्यांना १ लाख रक्कम भरल्याची पावती दिली नाही. रो-हाऊसची उर्वरित रक्कम देण्यासाठी शेरपाल यांनी आयडीबीआय बँकेकडे १० लाख गृहकर्ज मागितले आणि बँकेनेही ते मंजूर केले. परंतु बगारिआ बिल्डर्सने शेरपाल यांच्यासोबत सदनिका विक्री करारनामा केलाच नाही. त्यामुळे गृहकर्ज मंजूर झाल्यावर दिलेल्या मुदतीमध्ये करारनामा बँकेत सादर करता आला नाही.
परिणामी कर्ज न मिळाल्याने शेरपाल यांनी बगारिआ बिल्डर्स आणि डेव्हलपर्स्ला नोटीस दिली. परंतु नोटीसलाही उत्तर न देता डेव्हलपर्सनी उलट शेरपाल यांच्याकडून उरलेली रक्कम मागितली आणि आतापर्यंत २० टक्के रक्कमही न दिल्याने व्यवहार रद्द होवू शकतो आणि दिलेली रक्कमही जप्त केली जाईल असे सांगितले. त्यामुळे शेरपाल यांनी ग्राहक मंचाकडे तक्रार दाखल केली. पुरावे आणि कागदपत्रांची पडताळणी करून शेरपाल यांच्या खात्यातून २९ मार्च २००७ रोजी १ लाख रक्कम काढल्याचे पासबुकवरून स्पष्ट झाले. तसेच शेरपाल यांच्याशी सदनिकेचा करारनामा न केल्याने त्यांना बँकेकडून गृहकर्ज मिळाले नाही. (प्रतिनिधी)