जागा मालकाची फसवणूक: विकासका विरुद्ध गुन्हा
By Admin | Updated: December 17, 2014 23:09 IST2014-12-17T23:09:37+5:302014-12-17T23:09:37+5:30
जागा मालकाची फसवणूक केल्याच्या आरोपाखाली विकासक सुनील पाटील यांच्याविरोधात येथील एमएफसी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल

जागा मालकाची फसवणूक: विकासका विरुद्ध गुन्हा
कल्याण : जागा मालकाची फसवणूक केल्याच्या आरोपाखाली विकासक सुनील पाटील यांच्याविरोधात येथील एमएफसी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.मिलिंदनगर गौरीपाडा परिसरात राहणा-या गोपीनाथ भिवा माणेरकर यांनी दाखल केलेल्या तक्रारीवरून हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
माणेरकर कुटुंबियांनी त्यांची गौरीपाडा परिसरातील जमीन सन २००६ मध्ये डोंबिवलीतील मे. सुदामा असोसिएटस प्रा.लि कंपनीचे संचालक सुनील सुदाम पाटील यांना विकसित करण्यासाठी दिली होती.दरम्यान तीन वर्षाचा कालावधी उलटूनही जमीन विकसित करण्यात आली नाही याउलट संबंधित जमीन विकासक पाटील यांनी माणेरकर कुटुंबियांना विचारात न घेता २५ कोटी रूपये घेऊन अन्य एकाला विकसित करण्यासाठी दिल्याचा धककादायक प्रकार समोर आला. याबाबत माणेरकर यांनी पाटील यांना विचारणा केली असता त्यांना शिवीगाळ करीत धमकी देण्याचा प्रकार घडला. अखेर याप्रकरणी जमीन मालक असलेल्या माणेरकर यांनी एमएफसी पोलिस ठाणे गाठत तक्रार दाखल केली असून या तक्रारीवरून विकासक पाटील याच्या विरोधात पोलिसांनी फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे.
यात करारनाम्यातील अटीशर्तींचा भंग करून विश्वासघात केल्याचा आरोप करण्यात आला आहे. पुढील तपास सुरू असल्याचे एमएफसी पोलिसांकडून सांगण्यात आले. माणेरकर कुटुंबियांनी पाटील यांच्या घरासमोर उपोषण छेडण्याचा इशारा ही दिला होता.