Join us  

मुुंबईत भाजीपाल्याची स्वस्ताई; वाटाणा चाैपट घसरला, लसूण, बटाटाही झाला स्वस्त

By ऑनलाइन लोकमत | Published: January 19, 2022 5:35 AM

लसूण, बटाटा, गाजर, टोमॅटोचे दरही नियंत्रणात असल्यामुळे ग्राहकांना दिलासा

नवी मुंबई : हिवाळ्यात आवक वाढल्यामुळे भाजीपाल्याचे दर नियंत्रणात आले आहेत. बाजार समितीमध्ये एक महिन्यात वाटाण्याचे दर तब्बल चार पट घसरले आहेत. लसूण, बटाटा, गाजर, टोमॅटोचे दरही नियंत्रणात असल्यामुळे ग्राहकांना दिलासा मिळाला आहे. नवीन वर्षाच्या सुरुवातीपासून मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये भाजीपाल्याचे दर  नियंत्रणात येऊ लागले आहेत. डिसेंबरमध्ये होलसेल मार्केटमध्ये वाटाणा १०० ते १२० रुपये किलो दराने विकला जात होता. आता हे दर २६ ते ३० रुपये किलोवर आले आहेत. किरकोळ मार्केटमध्येही ३० ते ४० रुपये किलो दराने वाटाण्याच्या शेंगा मिळत असल्यामुळे स्वयंपाकघरात वाटाणा जास्त दिसू लागला आहे. प्रतिदिन २५० ते ३०० टन वाटाण्याची आवक होऊ लागली आहे.  मध्य प्रदेशमधून सर्वाधिक वाटाणा विक्रीसाठी येत आहे. बाजार समितीमध्ये प्रतिदिन ४० टन लसूणची विक्री होत असून, एक महिन्यात २० ते ५५ रुपये किलोवरून १५ ते ३० रुपयांवर बाजारभाव आले आहेत. किरकोळ मार्केटमध्येही ५० ते ८० रुपये किलो दराने लसूण विकला जात आहे. बटाटा, गाजर व इतर वस्तूंचे दरही कमी झाले असल्यामुळे ग्राहकांना दिलासा मिळाला आहे. लसूण व बटाट्याची आवक चांगली असल्यामुळे दर नियंत्रणात आहेत. दोन्ही वस्तूंची आवक चांगली होत आहे.      - अशोक वाळुंज,संचालक, बाजार समिती.वाटाण्याची आवक मोठ्या प्रमाणात होत असल्यामुळे दर घसरले आहेत. मेथी, कोथिंबीर व इतर वस्तूंचे दरही कमी आहेत.      - शंकर पिंगळे,संचालक भाजी मार्केट

टॅग्स :भाज्या