मुंबई - देशाच्या आर्थिक राजधानी मुंबईत स्वत:चे घर असावे हे स्वप्न प्रत्येकाचे असते. आता मध्यमवर्गीय कुटुंबाचे हे स्वप्न लवकरच पूर्ण होणार आहे. मुंबईच्या पश्चिम उपनगरात अल्प आणि मध्य उत्पन्न गटासाठी नवी टाउनशिप उभी राहण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत परवडणारी घरे बांधण्यासाठी बोरिवली येथील भारत संचार निगम लि.(BSNL) व महानगर टेलिफोन निगम (MTNL) यांच्या मालकीची आरक्षित जागा रेडीरेकनर दरानुसार घेण्यास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मान्यता दिली आहे.
बोरिवली येथील गोराई येथे भारत संचार निगम लिमिटेड यांच्या मालकीची तर शिंपाली येथे महानगर टेलिफोन निगमची जागा असून दोन्हींची मिळून एकूण २८.८४ एकर जागा आरक्षित आहे. ही आरक्षित जागा रेडिरेकनर दरानुसार ७२९ कोटी रुपयांना घेऊन या आरक्षित जागेवर प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत घरांचा प्रकल्प राबविण्यास तसेच उर्वरित आरक्षित जागा विकसित करण्याचा प्रस्ताव महामंडळाने बैठकीत ठेवला होता. या प्रस्तावास मुख्यमंत्री फडणवीस यांनी मान्यता दिली. या जागेवर सुमारे एक हजाराहून अधिक घरे बांधण्याचा प्रस्ताव असल्याचं महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक तसेच मुख्य कार्यकारी अधिकारी त्र्यंबक कासार यांनी सांगितले. महाराष्ट्र गृहनिर्माण विकास महामंडळाची बैठक मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली सह्याद्री अतिथीगृहात झाली. त्यावेळी हा निर्णय घेण्यात आला.
कुणाला मिळणार लाभ?
हा प्रकल्प प्रामुख्याने दोन श्रेणींमध्ये विभागलेला आहे. त्यात आर्थिकदृष्ट्या दुर्बळ घटक (EWS) आणि कमी उत्पन्न गट (LIG) या प्रवर्गातील लोकांना याचा लाभ होईल. या टाऊनशिपमधील घरे अंदाजे ४५० चौरस फूट क्षेत्रफळाची असतील आणि ती परवडणाऱ्या दरात उपलब्ध करून दिली जातील.
टाउनशिपमध्ये कोणत्या सुविधा उपलब्ध असतील?
हा प्रकल्प केवळ एक गृहनिर्माण प्रकल्प म्हणून नव्हे तर एक संपूर्ण टाउनशिप म्हणून विकसित केला जाईल. या परिसरात एक शाळा आणि रुग्णालय असेल. एक मनोरंजनात्मक खेळाचे मैदान आणि सांस्कृतिक केंद्र देखील उपलब्ध असेल. टाउनशिपमध्ये एक कौशल्य विकास केंद्र देखील स्थापन केले जाईल, जे तरुणांना रोजगारासाठी आवश्यक प्रशिक्षण देईल. दैनंदिन गरजांसाठी एक व्यावसायिक क्षेत्रही असेल. या टाउनशिपचे सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे येथील वाहतुकीची सोय. हा परिसर दोन मेट्रो स्टेशनच्या जवळ आहे. प्रस्तावित वर्सोवा-दहिसर कोस्टल रोडला थेट जोडणी असल्यामुळे दक्षिण मुंबई आणि अंधेरीला पोहोचणे सोपे होईल.
भूमीपूजन लवकरच होणार
मुख्यमंत्र्यांनी जमीन हस्तांतरण प्रक्रियेला गती देण्याचे निर्देश दिले आहेत. या प्रकल्पाचा भूमीपूजन सोहळा पुढील दोन ते तीन महिन्यांत पार पडण्याची शक्यता आहे. हा भव्य प्रकल्प पुढील तीन ते चार वर्षांत पूर्ण करण्याचे लक्ष्य आहे असं महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक त्र्यंबक कासार यांनी सांगितले.
Web Summary : Mumbai's middle class will soon realize their dream of owning homes. A 28-acre township with over 1000 affordable homes is planned in Borivali under the PM Awas Yojana, featuring schools, hospitals, and easy connectivity.
Web Summary : मुंबई के मध्यम वर्ग का घर का सपना जल्द होगा साकार। बोरीवली में पीएम आवास योजना के तहत 1000 से अधिक किफायती घरों वाली 28 एकड़ की टाउनशिप की योजना है, जिसमें स्कूल, अस्पताल और आसान कनेक्टिविटी होगी।