Join us

चवळी, लालमाठला आला ‘भाव’, ग्राहकांच्या खिशाला महागाईची फाेडणी

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 2, 2020 01:51 IST

vegetable prices in mumbai : मुंबईत राज्यातील विविध जिल्ह्यांतून भाजीपाल्याचा पुरवठा करण्यात येतो. यामध्ये नाशिक, सातारा, पुणे, सांगली कोल्हापूर येथून जास्त प्रमाणात भाजीपाला येतो

- नितीन जगताप

मुंबई :  गेल्या काही दिवसांत चवळी आणि लालमाठची आवक कमी झाली असून त्यामुळे भाव दुप्पट झाले आहेत. राज्यात अनेक ठिकाणी पाऊस झाला. त्यामुळे उत्पादन घटले असून भाजीपाल्याचा पुरवठा कमी होत होता. गेल्या काही दिवसांत पाऊस झाला नसला तरी पावसामुळे भाजीपाल्याचे नुकसान झाल्याने आवक कमी झाली आहे.मुंबईत राज्यातील विविध जिल्ह्यांतून भाजीपाल्याचा पुरवठा करण्यात येतो. यामध्ये नाशिक, सातारा, पुणे, सांगली कोल्हापूर येथून जास्त प्रमाणात भाजीपाला येतो. पावसामुळे या भागातून येणाऱ्या भाजीपाल्याची आवक घटली आहे. त्यामुळे दर वाढले आहेत. त्यातच लालमाठ आणि चवळी या भाज्या कमी विक्रेत्यांकडे उपलब्ध आहेत. त्यामुळे त्यांचे भाव चांगलेच वाढले आहेत.असे वाढले दरमेथी, शेपू आणि पालकच्या दरातही १० ते २० रुपयांची वाढ झाली आहे. पालक ३५ रुपये, मेथी ३० ते ३५, लालमाठ ३०, चवळी ३० रुपये जुडी मिळत आहे. तर शेपू ३० ते ५० रुपये, फरसबी १००, वाल ८०, शेवगा १२०, पडवळ १००, , टोमॅटो ८०, तोंडली ८०, मिरची १२० रुपये किलो दराने मिळत आहे.

गुजराती पालकला मागणीपालक, मेथीचे दरही दुप्पट झाले आहेत. तर फरसबी, शेवग्याच्या शेंगा आणि हिरवी मिरची १०० रुपये किलो दराने विकली जात आहे. नाशिक, सातारा आधी ठिकाणांहून पालक येत असला तरी तेथील पालकपेक्षा गुजरातवरून येणाऱ्या पालकची पाने मोठी असल्याने त्याला मागणी जास्त आहे.- अशोक सकट, भाजी विक्रेता

डाळींच्या दरात घसरणडिसेंबरमध्ये नवीन डाळी येत असतात. त्यामुळे जुन्या डाळींची आवक वाढली आहे. तूरडाळ यापूर्वी १२० रुपये किलाे हाेती त्यात आता १० रुपये घसरण झाली आहेे. तर प्रत्येकी १२० रुपये किलाे असलेला मूग आणि हरभरा डाळही २ ते ३ रुपयांनी स्वस्त झाली आहे.    - ऋषी ठक्कर, व्यापारी

घर चालवायचे कसे?अनेक भाज्या १०० रुपयांपेक्षा जास्त दराने विकल्या जात आहेत. काेराेना संकट काळात आधीच पगार कमी येत आहे, त्यात खर्च वाढत आहे. त्यामुळे घर चालवायचे कसे? असा प्रश्न सतावत आहे.- अंकिता वाघमारे, ग्राहक

टॅग्स :मुंबई